________________
(५८२)
प्रकरण सहावे
वैराग्यातून योग भावनेच्या दिशेने साधकाचा विकास
संसारात भौतिक साधना अनेक असतात. त्याने लौकिक लाभ प्राप्त होतो. उदा. गायक, वादक जेव्हा अनेक वर्षे स्वरसाधना करतात, वाद्ययंत्रावर कित्येक वर्षे निरंतर अभ्यास करतात. तेव्हा कुठे ते आपल्या विषयात पारंगत होतात. जादुगार, नर्तक, अभिनेता, चित्रकार, साहित्यकार यांना काही एका दिवसात विद्वत्ता अचानक प्राप्त होत नाही. त्यासाठी चिरकाल एकाग्रतातेने साधना करावी लागते. युद्धकलेचा बऱ्याच कालावधीपर्यंत अभ्यास केल्यानंतर सुयोग्य योद्धा तयार होतो. व युद्धात आपले कौशल्य दाखवू शकतो. शेतकरी शेताची, सुतार लाकडाची, लोहार लोखंडाची, स्वर्णकार सोन्याची आणि मूर्तिकार दगडाची साधना करतो. तेव्हा कुठे आपल्या शिल्पकलेत, व्यापार उद्योगात सफलता प्राप्त करतात. ते आपल्या प्रयत्नाने व कौशल्याने त्या अनगढ़ वस्तूंना बहुमूल्य बनवतो. पहिलवान व्यायाम शाळेत नियमित कठोर परिश्रम करून शरीर कमावतो. विद्यार्थी किशोरावस्थेपासून विद्यासाधना करतो तेव्हा मग विद्वान बनतो. अशाप्रकारे प्रत्येक कार्याच्या कलेच्या मागे अभ्यास अत्यंत आवश्यक आहे.
अशाप्रकारे आत्म्यासाठी साधना करताना, साधक उर्ध्यगमन करण्यासाठी भावनायोगाच्या साधनेत उत्तरोत्तर विकास करतो. भावनायोगाची साधना निरंतर केल्याने, अभ्यास केल्याने साधक सर्व कलेत जी श्रेष्ठ कला धर्मकला आहे यात पारंगत होतो.
एखाद्या इंजिनियरला बिल्डिंग बांधायची असेल तर तो प्रथम मन-मस्तिष्कात त्याचा आकार प्रकार इ. साऱ्या कल्पना, भावना यांचा विचार करतो, नंतर नकाशा काढतो. खर्चाचा हिशोब लावतो नंतर निर्माण कार्य सुरू करतो. त्याचप्रमाणे जीवन निर्माण करण्यासाठी आध्यात्मिक साधक मनात भावना संग्रहित करतो आणि तसा व्यवहार करण्याचा प्रयत्न करतो. भावना वाढविण्यात प्रगती करतो. व शेवटी एक दिवस शुद्धात्मभावाचे विशाल भवन निर्माण करतो. भावनायोगात अग्रसर होऊन साधक अनित्यादी वैराग्य भावनेने संसाराची विषमता, विविधता इ.चा अभ्यास करता-करता प्रगतीशील होतो.