________________
(७१८)
पहिल्यांदाच ह्या आगमाच्या ३६व्या अध्ययनाच्या अंतिम गाथेत दिसून येतात.
अशाप्रकारे आगमात भावनेविषयी जे वर्णन प्राप्त होते त्याचा उल्लेख तिसऱ्या प्रकरणात गवेषनात्मक दृष्टीने केला आहे.
प्रकरण ४ : 'आगमोत्तर काळच्या लेखकांचा परिचय आणि अशुभभावना'
आगमोत्तर काळात ज्या ज्या लेखकांनी भावनेसंबधी आलेखन केले आहे त्यांचा ह्या प्रकरणात थोडक्यात परिचय दिला आहे. जैन दर्शनामध्ये मानवाच्या मनोभावनेचे आणि आंतरिक मनोवृत्तीचे विस्तृत विश्लेषण केले गेले आहे. प्रत्येक मानवाच्या मनात शुभ किंवा अशुभ भावना सतत मिश्रित होतच असतात. या शुभाशुभतेचा संघर्ष मनुष्याला नेहमी दुःखी, कष्टी करत असतो. म्हणूनच अकल्याणकारी अशुभ भावनेचा परिचय करणे आणि त्यापासून मुक्ती मिळविणे अनिवार्यच आहे. जैन धर्माच्या मान्यतेनुसार प्रत्येक साधकाने क्रमवार पापप्रवृत्तीने मुक्त होऊन शुभ कल्याणकारी पुण्यप्रवृत्तीच्या दिशेने प्रगती केली पाहिजे. दुसऱ्या शब्दात म्हटले तर दोषाचा परिहार आणि गुणांचा स्वीकार हे मानवाचे खरे कर्तव्य आहे. ही प्रवृत्तीच त्याला परमशांती आणि परमसुख देईल.
___ अशुभ भावनेने मुक्त होऊन शुभ भावनेत आणि शेवटी शुद्ध भावनेच्या दिशेने विवेकपूर्वक प्रवृत्ती करण्याचे मार्गदर्शन वीतराग परमात्मा भगवान महावीरांनी त्यांच्या साधकाला वारंवार केले आहे. कारण मानवाच्या मनाच्या गतीचे आणि चंचलतेचे मोजमाप काढणे फारच कठीण आहे. शुभमधून अशुभतेकडे खेचून नेण्याचे काम मनाची चंचलताच करते. म्हणूनच शास्त्रकारांनी प्रत्येक मानवाला आणि साधकाला मनावर विजय मिळविण्यासाठी अथवा मनाच्या अशुभ प्रवाहावर अंकुश ठेवण्यासाठी पुन्हा पुन्हा निर्देश केला आहे.
जैन दर्शनामध्ये अशुभ भावनांचे आणि त्यांच्या भेदांचे अनेक ठिकाणी वर्णन प्राप्त होते आणि प्रत्येक मोक्षार्थी साधकाने अशुभ भावनांवर विजय मिळवण्याचा पुरुषार्थ केला पाहिजे असे पण भारपूर्वक दर्शविले आहे. कारण अशुभ भावनेने ग्रासलेल्या व्यक्ती समाजामध्ये घातक सिद्ध होतात.
अशुभ भावना असलेल्या व्यक्तीमध्ये पाखंड, घमंड, क्रोध, कटुता आणि अज्ञान इत्यादी दुर्गुण असल्याने ते बंधनाने बांधले जातात.
अभिधान राजेन्द्र कोषामध्ये अकल्याणकारी अशुभ भावनेची चर्चा करताना अशुभ भावनेला अप्रशस्तभावना नावाने संबोधिले आहे. त्यात हिंसा, असत्य, चोरी, मैथुन