________________
(७३२)
आत्मशांतीसाठी आणि व्यवहारिक जीवन सुरळीत चालण्यासाठी या भावनेचे अत्यंत महत्त्व आहे, म्हणजे ह्या भावनेद्वारा लौकिक आणि लोकोत्तर अशा दोन्ही प्रकारचे सुख प्राप्त होतात.
भावनेच्या विविध पुष्पांची माळ जे मुमुक्षू धारण करतील त्यांचे जीवन वैराग्यरूपी सदगुणांनी सुगंधित होईल व रागद्वेषरूपी दुर्गंध दूर होईल. ते शीघ्राती शीघ्र वीतरागता प्राप्त करून सिद्ध-बुद्ध-मुक्त होतील.
प्रकरण ६ : 'वैराग्यातून योगभावनेच्या दिशेने साधकाचा विकास'
योग अथवा ध्यान जैन धर्माच्या साधकांसाठी अत्यंत महत्त्वाचे आलंबन आहे. कोणत्याही साधकाच्या अंतःकरणात वैराग्यभावाचा विकास व्हावा, सांसारिक आकर्षण प्रलोभन आणि प्रवृत्तीपासून विमुख होऊन मोक्ष मार्गाकडे त्याची सम्यक् प्रवृत्ती व्हावी हाच महत्त्वाचा उद्देश असतो. त्या उद्देशाच्या पूर्तीसाठी योग अथवा ध्यान अत्यंत उपकारी आहे.
ह्या सहाव्या प्रकरणात मैत्री, प्रमोद, करुणा आणि माध्यस्थ्य या चार योग भावनांचे जैन दर्शनात जे महत्त्व दर्शविले आहे त्याचे विस्तृत आलेखन केले गेले आहे.. संसार आणि धर्मध्यानात जो दूरावा उत्पन्न झाला आहे त्याला जोडण्याचे काम या चार भावना करतात. म्हणून ह्यांना अनुसंधान करणाऱ्या भावना देखील म्हणतात. समतायोग व्यवहारात आणण्यासाठी आपल्या मन मस्तिष्कात मैत्री इत्यादी भाव असणे आवश्यक आहे.
१) मैत्री भावना सर्व विश्वाचे सुख स्वास्थ्य आनंदमय जीवन असावे या दृष्टीने मैत्री भावनेचे अतिशय महत्त्व आहे. या भावनेवरच संपूर्ण जगाचा व्यवहार आधारित आहे. मैत्रीभाव नसला तर सर्व आपल्या आपल्या स्वार्थात राहतील. एक दुसऱ्याबरोबर शत्रुत्व ठेवेल म्हणून पारिवारिक, सामाजिक, राष्ट्रीय सर्व व्यवहारांच्या सुरक्षेसाठी मैत्री भावना आवश्यक आहे.
जो सर्व प्राणिमात्रात आपल्या आत्म्याचे दर्शन करतो तो समदर्शी आहे. तो सुख संवर्धन आणि दुःख निवारणाचा प्रयत्न करतो. मैत्रीपूर्ण भावना असली तर परोपकाराचे कार्य केल्यावर अहंकार किंवा गर्व होत नाही. तो नम्र भावनेने आपले कर्तव्य करतो.
मैत्री भावनेने चित्त निर्मळ होते. चित्त निर्मळ झाले की हृदय शुद्ध होते. आणि शुद्ध हृदयातच धर्म राहातो. म्हणजे ते जीव बहिरात्मभावातून निघून अंतरात्मभावात प्रवेश