________________
(७३५)
असते त्याचे जीवन धर्माच्या सुवासाने सुगंधित होते. त्याचे स्वतःचे जीवन उज्ज्वल बनते आणि त्याच्या संपर्कात येणाऱ्याचे जीवन पण सद्गुणाने समृद्ध होते.
ह्या चारी भावनांना स्वतःच्या हृदयात स्थान देणारा मनुष्य स्वतःच्या मनुष्यजन्माचे सार्थक करतो, उज्ज्वल करतो आणि पुढे जाता तो आपल्या आत्म्याला परमात्मस्वरूपी पण बनवू शकतो.
ह्या चार भावनांचा जितका प्रचार, तितकी जगाची संपत्ती जास्त होईल आणि ह्या चार भावनांची जितकी विपरीतता असेल तितकी जगात आपत्ती वाढेल.
संपत्ती आत्मिक असो वा भौतिक ती सर्वांना प्रिय आहे आपत्ती अप्रिय आहे, तर प्रिय अश्या आत्म वैभवाला प्राप्त करण्यासाठी ह्या भावनेचे सतत चिंतन मनन करावे,
प्रकरण ७ अशुभपासून शुभ व शुभ पासून शुद्धतेकडे भाव यात्रा'
भारतीय संस्कृती आणि भारतीय तत्त्वज्ञानात आत्माविषयी खूप विस्तृत विवेचन झाले आहे. आणि म्हणूनच भारतीय दर्शनशास्त्राची एक शाखा आत्मदर्शन शाखेच्या रूपात विशेष प्रसिद्ध आहे. जैनदर्शन तर आत्मदर्शनालाच सर्वस्व मानते. आत्मा अजर, अमर, शाश्वत आहे. मानवाने सम्यक् पुरुषार्थ करून कर्मबंधनातून मुक्त होऊन आत्म्याच्या उत्तम गुणांची प्राप्ती करायची आहे. जैन दर्शनात स्पष्टपणे सांगितले आहे की आत्मा अनंतगुणांचा स्वामी आहे. परंतु कर्माच्या आवरणाखाली झाकला गेला आहे, विषय कषायाच्या बंधनाने बद्ध होऊन स्वतःचे स्वरूप विसरला आहे. त्या उत्तम स्वरूपाला प्राप्त करण्यासाठी वेगवेगळ्या भावनांची मदत घेऊन स्वतःच्या वास्तविक स्वरूपाचा परिचय मिळवणे आवश्यक आहे.
भावना मनुष्याला एकदम सरळतेने सांसारिक प्रवृत्तींपासून विन्मुख करून आत्मसाधनेच्या प्रवृत्तीत जोडते. जसजसे भावनेचे चिंतन साधक करत जातो तसतसे त्याला समजू लागते की ह्या संसारात अथवा संसारच्या कोणत्याही विषयात, स्वजन, मित्र अथवा परिवारात उत्तम कल्याण करणारे कोणीच नाही. म्हणून संसाराचे सर्वकार्य दुःखमयच आहे. ज्याला मनुष्य सुखरूप समजून बसला आहे ते मात्र सुखाभास आहे. संसाराची समग्र प्रवृत्ती दुःख प्रधान आणि अल्पसुखाने भरलेली आहे. सुखाचे तर मात्र दोन-चार थेंब आणि दुःखाचे महासागर आहे. दुःखाच्या अश्या विषमतेतून बाहेर निघण्याचा एकमात्र मार्ग धर्म आणि आत्मस्वरूपाची खरी समज प्राप्त करण्यातच आहे.