________________
ह्या बारा भावना धर्माचे अनुसंधान करणाऱ्या आहेत. धर्मध्यानाच्या हेतूभूत ह्या भावनांचे चिंतन केल्याने आत्मा आदर्श प्रदेशात विचारण्याचे वातावरण जमवू शकतो. चैतन्यस्वरूप आत्म्याची गुणशक्ती जी झाकली गेली आहे, त्याचे जे कंचनत्व कोमेजले आहे, त्याच्या शुद्धज्ञान प्रकाशावर जे आवरण आले आहे, ते दूर करून आत्म्याच्या शुद्ध स्वरूपाला प्रकट करण्यासाठी त्यायोग्य वातावरण बनवणे आवश्यक आहे आणि ते बनवण्याचे सुंदर काम बारा भावनांद्वारा होते.
धर्मध्यानात प्रवेश करण्यासाठी ह्या भावना हेतुभूत आहेत. ह्याच्यातील एकेका भावनेचे जिच्या मूळ स्वरूपाचे दीर्घ काळापर्यंत चिंतन केले आणि सर्व क्रियाकर्म सोडून दिले तर संपूर्ण भवचक्राचा फेरा नेहमीसाठी सुटतो. ह्या बारा भावनांच्या प्रकरणाचा उपसंहार बारा भावनांच्या चिंतनाची पद्धती, त्याचा आशय व निष्कर्ष इथे वर्णन केला जात आहे.
१) अनित्यभावना - योग आणि वियोग हे मानव जीवनात येणारे स्वाभाविक अनुभव आहेत. जे प्राप्त होते त्याला योग म्हणतात. आणि प्राप्त झालेली वस्तू नष्ट होते त्याला वियोग म्हणतात. आपण स्वतः जमा केलेल्या वस्तूंचा वियोग झाला की दुःख होते. परंतु आपल्या शरीरासकट जितक्या पण वस्तू दृश्यमान आहेत त्या नाशवान आहेत. त्यांचा वियोग निश्चित आहे. अशावेळी दुःख करू नये असा उपदेश महान संत आत्मज्ञानीयांनी दिला आहे. अशा योग आणि वियोगावर सूक्ष्मपणे खोलवर विचार करणे म्हणजे अनित्य भावना आहे.
मनुष्याच्या मनात काळ, परिस्थिती आणि संयोगाच्या आधाराने अनेक इच्छा उत्पन्न होतात आणि नष्ट होतात. ज्याप्रमाणे महासागरात लाटा येतात व विलिन होतात. परंतु एक महा इच्छा अशी आहे की ती नेहमी राहाते. कोणत्याही काळात. परिस्थितीत किंवा संयोगात त्यात परिवर्तन होत नाही. ही महा इच्छा आहे- 'दुःख रहित शाश्वत सुख प्राप्त करण्याची.' पण ते सुख अधिकांश मनुष्यांना प्राप्त होत नाही. त्याचे कारण असे आहे की सुख कसे प्राप्त करावे ह्याचे ज्ञान नाही. अज्ञानी जीव सुख मिळविण्यासाठी भौतिक वस्तू प्राप्त करतो. त्यांना सुरक्षित ठेवतो. त्यांचा उपयोग करतो. परंतु तत्त्वज्ञ महापुरुष म्हणतात की भौतिक वस्तूने दुःखरहित शाश्वत सुख मिळणे शक्य नाही. कारण भौतिक वस्तू अनित्य आहेत. अनित्य वस्तूंनी नित्य सुख कसे मिळणार ?
नित्य सुख नित्य वस्तूनेच मिळते आणि ती नित्य वस्तू आहे आत्मा. आत्मा नित्य आहे आणि दुःखरहित शाश्वत सुखाने युक्त आहे. म्हणून जो आत्म्यात लीन होतो