________________
(६९८)
काय मोक्ष मिळणार आहे ? हे तर असे झाले की "बोलाचीची कढी आणि बोलाचाच भात." विचारात आणि आचरणात साम्य असेल तरच तो आध्यात्मिक म्हणावा. म्हणून असं म्हणणंही बरोबर नाही की, त्यांनी प्रत्याख्यान प्रतिक्रमण आणि संयमाला आपल्या स्वभावात उतरवले आहे म्हणून बाह्य काहीच आवश्यकता नाही.
__ जर त्यांनी जीवनात ते सिद्ध करून घेतले असते तर आता वर्तमानात जसे जगत आहेत तसे कधीच जगले नसते. त्यांच्या वागण्यात निश्चितच बदल दिसला असता. आत्मिकजागृतीचा प्रभाव कधीच लपून रहात नाही.
हे कटुसत्य आहे की, आंतरिक दुर्बलता असल्यामुळे असे बोलले गेले आहे. जर तत्त्वज्ञानाच्या गप्पा मारून, चिंतन करून जीवनाचे ध्येय साध्य होते तर व्रत वगैरे कशाला करायचे ? सांसारिक जीवनपण जगावे. संसाराचा, उपभोग घ्यावा, खान-पान, रहन-सहन इ. मध्ये व्रत, नियमांचे बंधन ही नको. धर्म साधला जावा आणि आत्मआराधना पण गतिशील ठेवावी. आध्यात्मिक जीवन जगण्याचा हा स्वच्छंद विचार झाला. विचारमात्र केल्याने फक्त चिंतनात रममाण झाल्याने सिद्धी प्राप्त होत नसते. त्यासाठी चारित्र म्हणजे आचरणही शुद्ध असायलाच हवे. ते होते व्रत नियमाने. याचा खोलवर विचार करण्याची आवश्यकता आहे. फक्त तत्त्वचर्चा मूलक धर्माराधनाचा प्रसार केल्याने त्याचा विपरीत परिणाम येऊ शकतो. जैनसमाजाची संस्कारशीलता, खान-पान, रहन-सहन, व्यापारव्यवसाय, यात्रा-प्रवास इ. विविध कार्यांशी संबंधित व्रतमूलक अनुशासन बद्धता, नियमानुवर्तिता, कुव्यसन परित्याग इ.चा क्रमशः लोप होऊन जाईल. त्याचा परिणाम असा येईल की, हजारो वर्षांपासून महानज्ञानी, संत, चिंतक साधक यांच्याद्वारे परिपोषित, संवर्धित संस्कृती एक दिवस नष्ट होऊन जाईल. मात्र तत्त्वचर्चा मूलक धार्मिक उपक्रम एक प्रतिबंधरहित, अनुशासनवर्जित, जीवनसारिणीचा विस्तार करण्यात बल मिळेल. वास्तविक निश्चय, शुद्धनय वा शुद्धोपयोगाच्या दृष्टीने चिंतन करणारे वीतराग देव द्वारा प्ररूपितउप्पन्नेइ वा विगमेंइ वा धुवेइ वा या त्रिपदीच्या पृष्ठभूमीवर आधारित अनेकांतिक दृष्टीने गहन चिंतन करावे, मनन करावे, जगाच्या वास्तविक स्वरूपाचे आकलन करावे, आपल्या व्यक्तित्व वा कृतित्वाचे परिक्षण करावे तथा समन्वयाचा मार्ग स्वीकारावा. जोपर्यंत ते शुद्धोपयोगाच्या अतिउच्च भूमिकाला अधिकृतपणे प्राप्त करीत नाही तोपर्यंत व्रत, नियम इ.चा आदर करायला पाहिजे. आचरण करायला पाहिजे. त्याची अनुभूती करायला पाहिजे. अनुभूतीने सत्यतत्त्वाचा साक्षात्कार होतो.