________________
आत्म्याचा शुद्ध भाव किंवा शुद्धोपयोगात येणे. अर्थात जो आत्मा अतीतमध्ये परभावापन्न होता त्याचा परत आपल्या स्वभावात येणे. हीच गोष्ट प्रत्याख्यानासंबंधी लागू होते. ते ही तेव्हाच सिद्ध होतात जेव्हा भविष्यात शुभाशुभ कर्माशी बद्ध आत्मा भावात्मक रूपाने त्यापासून परावृत्त होते.
आलोचना सुद्धा शुभाशुभ उदीर्ण कर्मांच्या दोषांना समजून आत्मानुभूती केल्यानेच सिद्ध होते. म्हणून प्रत्याख्यान, प्रतिक्रमण, आलोचना हे तर नित्य प्रतिक्षण करण्याच्या अवस्था आहेत. ह्या तर जीवनभर करण्याच्या क्रिया आहेत. हे शुद्धोपयोगाचे यथार्थ स्वरूप आहे.
क्रिया व्यवहाररूप आहेत. त्या सर्व शुभोपयोगाच्या अंतर्गत येतात. बाह्यवेषद्रव्यलिंग वास्तविक ते शरीराश्रित आहेत. म्हणून पर-द्रव्य आहे. मोक्षाचा मार्ग नव्हे. दर्शन, ज्ञान आणि चारित्र हे आत्माश्रित आहेत. म्हणून ते स्व-द्रव्य आहेत. जिनेंद्रदेव यांनाच मोक्षाचा मार्ग म्हणतात. म्हणून सागार-गृहस्थ अनगार-मुनी यांचे बाह्य लिंग किंवा क्रिया-कलापात आसक्त न होता आत्म्याला दर्शन, ज्ञान, चारित्र रूप साक्षात सत्य अशा मोक्ष मार्गाकडे जोडावे.३७
श्लोकात द्रव्यलिंगाला सोडण्याबद्दल जे सांगितले आहे त्याचा अभिप्राय असा नाही की मुनींचा बाह्य वेष सर्वथा त्याज्य आहे. श्रावकाचे व्रतात्मक बाह्य क्रिया-कलापांचा त्याग करावा. या कथनाचा अभिप्राय हा आहे की बाह्य वेषातच आणि क्रिया-कलापातच आत्मसाधनेची सिद्धी मानू नये. असे मानले तर ज्ञान, दर्शन आणि चारित्र जो भावात्मक आत्मशुद्धीचा वास्तविक मार्ग आहे याची समज कशी येणार ?
तत्त्वसारमध्ये कर्म, नो कर्म वगैरे आत्म्याचे विभाव भाव आहेत असे प्रतिपादन केले आहे. आत्म्याशी त्यांचा कसा संबंध आहे याचे विवेचन करताना लिहितात ज्याप्रमाणे दुधात पाणी मिसळल्यावर त्यांचा जो संबंध होतो, त्यांना परत वेगवेगळे करणे कठिण त्याचप्रमाणे जे आपआपल्या स्वरूपात विद्यमान आहेत त्या आत्मा व कर्माचा संसारावस्थामध्ये एकरूप झालेत असे प्रतीत होते.३८ परंतु दोन्ही वास्तविक रूपात एक नाहीत.
कोणी जर तर्कयुक्तीने पाणी व दूध वेगळे करतो. त्याचप्रमाणे ज्ञानीपुरुष सुद्धा उत्तम ध्यानयोगाने उत्कृष्ट चिंतनात्मक ज्ञानाने चेतन स्वरूप आत्मा आणि अचेतन स्वरूप परपदार्थाचे भेद करतात. आणि त्यांना वेगवेगळे समजतात.