________________
(६७३)
ध्यानाच्या उत्कृष्ट चिंतनात्मक ज्ञानाने पुद्गल आणि जीव तथा कर्म आणि आत्मा यात भेद आहे हे समजले पाहिजे, नंतर त्यांना भिन्न आहेत हे समजले पाहिजे. सिद्ध स्वरूप परमात्म स्वरूप आत्मा ग्रहण करायला पाहिजे, जाणले पाहिजे किंवा अनुभव करायला पाहिजे.
ज्याप्रमाणे कर्म विरहित आत्मा, ज्ञानस्वरूप आत्मा सिद्ध स्थानात निवास करते त्याचप्रमाणे परब्रह्म स्वरूप-परमात्मस्वरूप आत्मा देहात स्थित आहे असे समजावे.
तात्पर्य हे की, देहवर्ती संसारी आत्मा सुद्धा निश्चयनयाच्या दृष्टीने तितकीच शुद्ध आहे जितकी सिद्ध किंवा मुक्त आत्मा आहे.
जीवाने असे चिंतन करावे - नो कर्म-कर्मरहित तथा केवलज्ञानादी गुणांनी सुशोभित सिद्ध आत्मा आहे तसाच मी शुद्ध, नित्य, निरालंब आत्मा आहे.
मी सिद्ध आहे, शुद्ध आहे, अनंतज्ञानादींनी समृद्ध आहे, देहप्रमाण आहे. नित्य आहे, असंख्यात प्रदेशात्मक आहे व अमूर्त आहे.
संसारी आत्मा आपल्या कर्माच्या आवरणामुळे शरीरात बद्ध आहे. त्याचे आत्मप्रदेश त्या शरीरात व्याप्त असतात. आत्मप्रदेशांची विशेषता आहे की, आत्म्याला आपल्या कर्माच्या परिणाम स्वरूपात लहान किंवा मोठे शरीर प्राप्त होते. शरीराप्रमाणे आत्मप्रदेश संकुचित किंवा विस्तृत होतात.
जो शरीराची रुग्णता, पीडा, कष्ट, वार्धक्य व मृत्यू पाहून आत्म्याचे ध्यान करतो तो पंचविध शरीरापासून मुक्त होतो. अर्थात जो हे समजू शकतो पाहतो तो अनुभव करतो की ह्या शरीराची रुग्णता, पीडा, मृत्यू इ. जे दोष आहेत आत्म्यात त्यातील कोणताच दोष नाही. ह्या बाह्य शरीराशीच संबंधित आहेत. आत्म्याशी नाही. असे जो चिंतन करतो, शुद्ध भावनेने अनुभावित होतो तो आपल्या शुद्ध स्वरूपाला प्राप्त करतो.१०
कर्मफळाला भोगणारा जीव अज्ञानी आहे. मोहामुळे शुभाबद्दल राग (आसक्ती) करतो व अशुभाबद्दल द्वेष करतो.४१
याचे तात्पर्य असे की जीव जेव्हा अज्ञानदशेत अशुभ भाव किंवा शुभ भाव करतो, आपल्याला शुभ भावाशी अथवा अशुभ भावाशी जोडतो तेव्हा कर्माश्रवाची परंपरा गतिशील राहते. शुद्ध भाव किंवा शुद्धोपयोगच आत्म्याची ती स्थिती आहे जिथे कर्माश्रव रुद्ध होतात. कर्म येण्याचा रस्ता बंद होतो. म्हणून आत्म्याने ही भावना भावित करीत
रहावे.