________________
(६५९)
प्रकरण सातवे अशुभाकडून शुभ आणि शुद्धाकडे जाण्याचा राजमार्ग
भारतीय दार्शनिकांच्या चिंतनाचा मुख्य व अंतिम विषय आत्मा आहे. परंतु जेव्हा जीवात्मा अशुभ भावनेचा परित्याग करून शुभभावनेमध्ये येतो तेव्हाच शुद्ध भावनेकडे अग्रेसर होतो. कारण की परिणाम उत्तरोत्तर निर्मलतेकडे जातात. म्हणून ती क्रमशःच होत जाते. ज्याने पहिल्या पायरीवर पाय ठेवला तो दुसऱ्या पायरीवर पाय ठेवून पायऱ्या चढतच जाणार. परंतु ज्याने पहिल्याच पायरीवर पाय ठेवलाच नाही तर तो दुसरी पायरी चढूच शकणार नाही. जो पायऱ्या चढतो त्याची शुभभावना परिपूर्ण झाली. मुमुक्षू असणाराच शुद्ध भावनेत पुढे जातो. म्हणून पूर्व प्रकरणात शुभाशुभ भावनांचा विचार प्रकट केल्यानंतर अशुभाकडून शुभ आणि शुभाकडून शुद्धाची अंतरयात्रा याचे या प्रकरणात विवेचन केले आहे.
अशुभ विकृती आहे; शुभ संस्कृती आहे आणि शुद्ध प्रकृती आहे. आत्म्याचा नैसर्गिक स्वभाव अनन्तज्ञान, अनन्तदर्शन, अनन्तसुख आणि अनन्त शक्ती आहे. परंतु त्याच्यावर कर्मांचे आवरण आलेले आहे. विचार आणि ज्ञान-विज्ञानाची ज्योती घुमिल झाली आहे. ती धूळ झटकायची आहे. हेच मानवाचे प्रथम कर्तव्य आहे.
आत्म्याच्या मूलगुणांवर विकारांचा मळ साचला आहे. त्याला दूर करून मूळ स्वरूपात आत्म्याला आणायचे ही संस्कृती आहे.
आत्म्याच्या स्वभावाचे चिंतन केल्याने, आत्मस्वरूपाचे ध्यान केल्याने आत्मसिद्धी प्राप्त होते. सर्व ज्ञानीजनांनी हाच मार्ग स्वीकारला आहे. आत्मज्ञानाशिवाय आत्मभावना जागृत होत नाही. जो आत्म्याच्या शुद्ध ज्ञाता, द्रष्टा स्वरूपाची उपासना करतो तो स्वतः ज्ञाता-द्रष्टा बनून जातो. जशी कापसाची वात पेटवल्यावर ती वात आणि अग्नी स्वयं दीप बनून जाते, त्याप्रमाणे आत्मस्वरूपाच्या लाभासाठी आत्मस्वरूपाचे ज्ञान प्राप्त करणे आवश्यक आहे.
आपले जीवन घड्याळाच्या लोलकाप्रमाणे आहे. कधी अशुभ विचाराकडे तर कधी शुभ भावात तर कधी शुद्ध भावाची अनुभूती घेण्याकडे वळसे घेत असते. सुखी