________________
(६२)
साहित्यामध्ये खूप महत्त्व आहे. ह्यात छत्तीस अध्ययने आहेत, ज्यात अनेक महत्त्वपूर्ण चरित्रे, कथा आणि सिद्धांतांचे वर्णन आहे. त्यामधील मृगापुत्र, स्थनेमी आणि राजमती यांचा संवाद तसेच पार्श्वपरंपरेचे श्रमण केशीकुमार आणि गौतम यांचा वार्तालाप महत्त्वाचा मानलेला आहे.
दशवैकालिक 'विकाल' याचा अर्थ संध्या आहे. संध्याकाळी अध्ययन केल्याने ह्या आगमाचे नाव दशवैकालिक पडले आहे. ह्याची रचना 'शयंभव' नावाच्या आचार्यांनी केली. त्यांच्या जीवनचरित्राविषयी असे सांगितले जाते की ते ब्राह्मण कुळात जन्मलेले असून मोठे विद्वान होते. ते जैन सिद्धांताने प्रभावित झाले. आणि त्यांनी दीक्षा घेतली. जेव्हा त्यांनी दीक्षा घेतली तेव्हा त्यांची पत्नी गर्भवती होती. त्यांची दीक्षा झाल्यानंतर काही काळानंतर त्यांना पुत्ररत्न प्राप्त झाले. त्याचे नाव 'मनक' ठेवले. मनक मोठा झाल्यावर, त्याला आपल्या वडिलांनी दीक्षा घेतल्याचे समजले आणि तो पित्याला शोधत शोधत चंपानगरीला गेला. शयंभव दिव्यज्ञानी होय. त्यांना दिव्यदृष्टीने असे कळले की आपल्या पुत्राचे आयुष्य केवळ सहा महिन्याचे आहे. त्याला थोडक्यात आगमज्ञान देण्यासाठी त्यांनी दहा अध्ययनामध्ये दशवैकालिक सूत्राची रचना केली. ह्यात अत्यंत सरलतेने जैन आचार आणि सिद्धांताची थोडक्यात चर्चा आहे.
-
जर्मनीमध्ये डॉ. पिशल नावाचे फार मोठे प्राकृतचे विद्वान ह्याच शताब्दीत होऊन गेले त्यांनी दशनैकालिक आणि उत्तराध्ययनाला भाषाशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे मानले आहे.
नंदीसूत्र विद्वानांच्या मते नंदीसूत्र आणि अनुयोगद्वार ही सूत्रे अन्य आगमांपेक्षा अर्वाचीन आहेत. 'पट्टावली'मध्ये 'दूष्यगणी'चे नाव आलेले आहे. त्यांचे शिष्य ‘देववाचक' होते. त्यांनी या सूत्राची रचना केली असे मानले जाते. काही विद्वान अंतिम आगम वाचनेचे निर्देशक आचार्य देवर्धिगणी क्षमाश्रमण आणि देववाचक यांना एकच मानतात. परंतु इतरत्र मिळणाऱ्या माहितीवरून ही मान्यता सिद्ध होत नाही. कारण हे दोघेही वेगवेगळ्या संप्रदायाशी संबंधित होते असे लिहिले आहे. ह्या सूत्रावर आचार्य हरीभद्र आणि आचार्य मलयगिरी यांनी टिकेची रचना केली. ह्यात ज्ञानाचे पाच भेद सांगून त्यांचे वर्णन केलेले आहे.
'श्रुत' याचे अंगबाह्य व अंगप्रविष्ट असे दोन भेद केलेले आहेत.
अनुयोगद्वार
ह्या मूळ सूत्राची रचना 'आर्यरक्षित' यांनी केलेली आहे.