________________
(२९४)
कुल अत्यंत सुशोभित असते परंतु थोड्याच वेळानंतर ते कोमजले जाते. सुंदर, मनोज्ञ दसणारे यौवनसुद्धा असेच आहे. त्यालाही नष्ट होण्यास वेळ लागत नाही. उत्तरोत्तर व्यतीत होणारे आयुष्य आणि आकस्मात येणाऱ्या व्याधी यौवनरूपी फुलाला चिरडून टाकतात. जे संतपुरुष ह्याचे वास्तविक रूपाने चिंतन करतात ते ह्याच्यात मोहासक्त होत नाही. ज्यांच्या स्थिरतेचा काही भरवसा नाही ते कधी साथ सोडतील हे माहीत नाही याविषयी मोह बाळगणे योग्य आहे का ?
ह्या जगाच्या नश्वरतेचे, शरीर, आयुष्य आणि यौवन यांच्या क्षणिकतेचे चिंतन करून श्री पार्श्वकुमारांनी संसाराचा त्याग केला.
वर्तमानचे तेविसावे तीर्थंकर श्री पार्श्वनाथ' जेव्हा लहान होते तेव्हा जळत्या काष्ठात सर्प युगलांना तडफडून मरताना पाहिले. तेव्हा ते विचार करू लागले- संसारामध्ये जीवाला मृत्यूपासून वाचविणारा कोणीच नाही. इंद्र, धरणेंद्र चंद्र, सूर्य, व्यतरेंद्र, विद्याधर बलदेव, नारायण, प्रतिनारायण इत्यादी सर्वजण आयुष्याचा क्षय झाल्यावर मृत्युमुखी पडतात. पार्श्वकुमार वैराग्य रंगात अवगाहन करू लागले आणि पुढे विचार करू लागले की, पुदगलाचा हा स्वभावच आहे की तो कमी जास्त होत राहतो. आयुष्य ओंजळीतील जलाप्रमाणे ओसरून जाते. धन आणि सुख इंद्रधनुष्याप्रमाणे अस्थिर आहे. जुगाऱ्याच्या धनाप्रमाणे ते क्षणात दुसऱ्याचे होते. संध्याकालीन वादळाच्या रंगाप्रमाणे राग आणि रुची सुद्धा क्षणिक आहे. 'स्त्री भोग' तारागणाप्रमाणे तरल आहे आणि भाग्य जलधारेप्रमाणे चपळ आहे. नवयौवन नदीच्या पुराप्रमाणे क्षीण होणारे आहे. सौंदर्य आणि वर्ण दिवसेंदिवस क्षीण होणारे आहे. इंद्रियसुख विजेच्या चमकण्याप्रमाणे चंचल आहे. मृत्यूनंतर शरीरही आपले राहत नाही. राज्यभोगसुद्धा भारोपहत जीर्णपत्राप्रमाणे कोणासाठीही शाश्वत नाही. अशाप्रकारे संपूर्ण जगाला अनित्य मानून आपल्या मनामध्ये नित्य, निरंजन आणि शुद्ध जीवात्म्याची भावना करत करत पार्श्वजिन पुन्हा पुन्हा आपल्या मनात अनित्यादी भावनांचे चिंतन करू लागले. ३०
जे काही महापुरुष होऊन गेले ते संसाराचे, सांसारिक पदार्थांचे, जीवनाच्या अनित्यतेचे, अशरणतेचे चिंतन करून विरक्त झाले. त्याच भावनेने भव्य जीवांचा उद्धार करण्यासाठी अनेक संतांनी, आचार्यांनी, कवी आणि लेखकांनी आपल्या आपल्या शैलीत लोकांना समजाविण्याचा प्रयत्न केला आहे. पदार्थाच्या अनित्यतेचे वर्णन तर सर्वांनी केले आहे. परंतु सर्वांचे भाव, भाषाशैली, आणि दृष्टांत वेगवेगळे आहेत.