________________
ह्या चतुर्गतीरूप संसारात परिभ्रमण करण्याची चार कारणे आहेत.
जसे १) महा आरंभ २) महा परिग्रह ३) पंचेंद्रिय जीवाची हत्या आणि ही कुणप आहार अर्थात मांस भक्षण ह्या चार कारणांमुळे जीव नरक गतीमध्ये जाण्यायोग्य कर्माचे उपार्जन करतो.
१) मायाचार २) निकृतिमत्ता अर्थात दुसऱ्यांना फसविणे ३) असत्य वचन आणि ४) कूटतौल कुट माप (कमी तोलमाप केल्याने). यामुळे तिर्यंच गतीमध्ये जाण्यायोग्य कर्माचे उपार्जन होते.
१) प्रकृतीची भद्रता २) प्रकृतीची विनितता ३) सानुक्रोशता अर्थात दयाळूता आणि सहृदयता ४) अमत्सरित्वता अर्थात मत्सर भाव न ठेवल्याने, ईर्ष्या न केल्याने जीव मनुष्यगतीमध्ये जाण्यायोग्य कर्माचे उपार्जन करतो.
१) सराग संयम २) संयमासंयम ३) बालतप ४) अकाम निर्जरा यांनी जीव देवगतीमध्ये जाण्यायोग्य कर्माचे उपार्जन करतो.१०६
ह्या चतुर्गतींमध्ये भ्रमण करविणारी सोळा कारणे आहेत. ह्या सोळा चतुर्गतीभ्रमणांच्या कारणांमध्ये काही कारणे चांगली वाटतात. कारण प्रकृतीची भद्रता, विनितता तर असायलाच पाहिजे. ही गोष्ट खरी आहे परंतु जर राग असेल, आसक्ती असेल, अहंकार उत्पन्न होत असेल तर चांगली कार्येही संसार परिभ्रमणाची, कर्मबंधाची कारणे होतात. नरक, तिर्यंचगती यांच्या अपेक्षेने ही कार्ये योग्य होतील. परंतु मोक्षाच्या अपेक्षेने त्याज्य आहेत. जीवाला ह्या सोळा कारणांना सोडून मोक्षाला पोहचविणाऱ्या चार कार्यांची साधना केली पाहिजे.
१) ज्ञान - जीवादी नऊ तत्त्वांचे यथार्थ ज्ञान घेणे. २) दर्शन - क्षयिक सम्यक्त्व अर्थात यथार्थ श्रद्धाशील होणे. ३) चारित्र्यशील - यथाख्यात चारित्रसंपन्न, शुद्ध संयमी होणे. ४) तपस्वी - सम्यकज्ञानपूर्वक यथार्थ रीतीने तप करणे.१०७
ह्या चार कर्मांचे आचरण करणारे मोक्षास जातात. तेथून पुन्हा संसारात परिभ्रमण, संसरण करावे लागत नाही.
उपरोक्त चतुर्गती भ्रमणाच्या सोळा कारणांना जाणल्यानंतर कोणता असा जीव असेल जो अशाप्रकारच्या संसारचक्रामध्ये परिभ्रमण करण्यासाठी स्वतःच स्वतःला लाचार बनवेल.