Book Title: Jain Darshan Bhavna Part 01
Author(s): Punyasheelashreeji
Publisher: Sanskrit Pragat Adhyayan Kendra

View full book text
Previous | Next

Page 407
________________ (३९३) राहतात. त्यांना नष्ट केल्याने सर्व ताप, संताप आणि वेदनेतून मुक्ती मिळू शकते. हे शरीर तर एक दिवस जळणारच आहे. त्याच्या जळण्याने माझे काहीच जळत नाही. मी अन्य आहे आणि माझे शरीर अन्य आहे. त्याच्या जळण्याने माझ्या आत्म्याचा एक प्रदेशसुद्धा जळत नाही. तो तर अज्वलनशील आहे, अक्षय आहे, अमर आहे आणि अविनाशी आहे तरी ह्या विनाशी शरीरासाठी. जे माइन न भिन्न आहे. त्याची मी का चिंता करू ? हे अंगारे मस्तक जाळू शकतात, शरीराला क्षत-विक्षत करू शकतात आणि जाळून नष्टही करू शकतात. परंतु आत्मा ह्या शरीराहून भिन्न आहे आणि शरीराबरोबर राहूनही आपल्या गुण आणि पर्यायामध्येच परिणमन करतात त्याला हा अग्नी कधी जाळू शकत नाही. मग मी ह्या शरीरासाठी कोणाला दोष का देऊ ? कोणाबरोबर वैर का करू ? अशाप्रकारे भेदविज्ञानाद्वारे शरीराला 'अन्य' समजून जेव्हा मुनी 'स्व' स्वरूपात स्थिर झाले आणि परमशुक्ल ध्यानामध्ये स्थिर झाले तेव्हा घाती आणि अघाती सर्व कर्माचा क्षय करून गुणस्थानातीत अवस्था प्राप्त केली आपल्या शुद्ध स्वरूपाला प्रकट केले.१८८ अन्यत्व भावनेच्या चिंतनाने साधक 'स्व-पर'च्या भेदाला स्पष्टपणे समजून घेतो. भेदज्ञान झाल्यावर त्याच्या मनात आणि जीवनात 'स्व'हून भिन्न 'पर' शरीर आणि अन्य पर पदार्थावर ममत्व भाव राहत नाही. चिंतन देहभावापासून दूर होऊन आत्मभावात केंद्रित होते. त्यामुळे ममता, आसक्ती इत्यादी व्यामोहाची बंधने सहज तुटतात. आणि ममत्वाच्या शृंखलेचे तुटणे म्हणजेच संसार बंधनातून मुक्त होणे आहे. अन्यत्वभावनेचे चिंतन आत्म्याला आवृत्त करणाऱ्या मोहाच्या आवरणाला दूर करणारे चिंतन आहे. आत्मा आणि शरीर इत्यादींच्या वास्तविक स्थितीला स्पष्ट करण्यासाठी पंडित दौलतरामजी यांनी लहानशा उदाहरणाद्वारे अत्यंत सुंदर सांगितले आहे - जल - पय ज्यों जीव तन मेला, पै भिन्न भिन्न नहीं भेला । तो प्रकट जुदे धन धामाक्यों, हवै इक मिलि सुत रामा ॥१८९ पाणी आणि दुधाप्रमाणे आत्मा आणि शरीर एकमेकांत मिसळलेले आहेत तरी सुद्धा दुध आणि पाणी वास्तविक वेगवेगळे आहेत. तसेच जीव आणि शरीर अर्थात आत्मा आणि शरीर भिन्न भिन्नच आहे. एक नाही. जेव्हा एका क्षेत्रात राहणारे आत्मा आणि शरीर सुद्धा आत्म्याहून वेगळे आहेत तर मग धन, भवन, पुत्र, पत्नी इत्यादी आत्म्याबरोबर एकरूप कसे होऊ शकतील? आत्मा सर्वांहून वेगळा आहे.

Loading...

Page Navigation
1 ... 405 406 407 408