Book Title: Jain Darshan Bhavna Part 01
Author(s): Punyasheelashreeji
Publisher: Sanskrit Pragat Adhyayan Kendra

View full book text
Previous | Next

Page 398
________________ (३८४) ज्ञानी आणि अज्ञानी दोघांना भूक लागते. परंतु दोघांचा विचार करण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. ज्ञानी विचार करतो की भूक एक रोग आहे, त्याच्या उपचारासाठी भोजन करायचे आहे. हा ज्ञानीचा चिकित्सात्मक दृष्टिकोन होईल. अज्ञानी व्यक्तीचा भोजनाकडे रसास्वादाचा दृष्टिकोन असतो. तो विचार करतो की भोजन हे स्वादिष्ट असावे, मधुर असावे. दिसताना ज्ञानी व अज्ञानी यांची क्रिया सारखीच असते परंतु त्यामागील 'भाव' व दृष्टिकोन वेगळा असतो. ज्याची दृष्टी भूकेचा रोग मिटविणे आहे तो उपचारात्मक दृष्टिकोनाने भोजन करेल. आत्मा आणि शरीराची भिन्नता जाणणाऱ्याला सॉक्रेटिसप्रमाणे इच्छेपासून मुक्त राहणे आवश्यक आहे. कमळाप्रमाणे चिखलात सुद्धा अलिप्त राहता आले पाहिजे. प्रत्येक वस्तूचा उपभोग उपचारात्मक दृष्टीने केला पाहिजे तोच ज्ञानी आहे, त्यालाच भेदज्ञान होऊ शकते. आत्म्यापासून जे पदार्थ भिन्न आहेत त्याचे जीवात्म्याला सतत आकर्षण होत असते. त्यांना प्राप्त करण्यासाठी अनेक प्रकारचे विकर्षण जीवनात चालत राहतात. पुण्याचा उदय आकर्षणाचे कारण होते तर पापाचा उदय विकर्षणाचे निमित्त होते. ह्या पुण्य-पापात्मक आकर्षण विकर्षणाने जीवनात संघर्ष होत असतो. आत्म्याची विस्मृती होते. म्हणून आत्म्याहून जे काही अन्य आहे त्याचे आकर्षण तोडलेच पाहिजे. तेव्हाच आत्महिताचा खरा पुरुषार्थ होऊ शकेल. ____ आपल्या निर्मळ आत्मस्वभावाला सोडून अन्य वस्तूमध्ये वेडे होणे म्हणजे दुर्गतीचे तिकिट काढण्यासारखी विडंबना आहे. दुर्गतीच्या भयंकर दुःखाचा अनेकवेळा ह्या जीवात्म्याने अनुभव घेतला आहे. हे सर्व 'पर' पदार्थाच्या आसक्तीमुळे झाले आहे. आजपर्यंत जितके जन्म-मरणाचे दुःख भोगावे लागले ते सर्व 'पर' वस्तूच्या प्रीतीमुळे भोगावे लागले. तरीही व्यक्ती त्या सर्व गोष्टी विसरून तसेच कार्य करीत राहते. हे मूढतापूर्ण कार्य जीवनाच्या निर्लज्जतेची पराकाष्ठा आहे. उपाध्याय विनयविजयजी यांनी अत्यंत स्पष्ट शब्दात अन्यत्व भावनेचे वर्णन केले आहे. स्वतःलाच संबोधून ते गीतिकेमध्ये म्हणतात हे विनय ! जरा आपल्या घराला सांभाळ. शरीर, धन, स्वजन, परिवार ह्यांपैकी तुला दुर्गतिकडे जाण्यापासून कोण वाचवणार आहे.

Loading...

Page Navigation
1 ... 396 397 398 399 400 401 402 403 404 405 406 407 408