________________
(३२३)
मनी अथवा पुत्री होतो तर कोणी बहीण होऊन माता, खी, पुत्री होते. कोणी स्त्री होऊन बहीण, पुत्री किंवा माता होते. स्वामी सेवक होतो आणि सेवक स्वामी होतो अर्थात जतर्गतीमध्ये भ्रमण करणाऱ्या जीवाला कोणाबरोबरही एक निश्चित संबंध सांगता येत नाही. जो मित्र आहे त्याला जन्मांतरात शत्रू होताना पाहिले जाते. अशाप्रकारे अनादी काळापासून हे सर्व संसारी प्राणी मुख्यत्वे चौऱ्यांशी लक्ष योनीमध्ये भ्रमण करीत आहेत. राग-द्वेष त्याचप्रमाणे मोहाने अभिभूत राहिल्याने विषयासक्ती सोडू शकत नाहीत आणि परस्पर एकदसऱ्याचे भक्षण, ताडन, वध, बंधन इत्यादींमध्ये प्रवृत्त होत राहतात. आणि तज्जनित अत्यंत दारुण दुःख भोगत राहतात. म्हणून साधकाने संसाराच्या स्वरूपाचे पुन्हा पुन्हा चिंतन केले पाहिजे की, हा संसार द्वंद्वात्मक आहे. अर्थात इष्ट आणि अनिष्ट, सुख आणि दुःखरूपी युगलधर्माचा आश्रय आणि स्वभावतः कष्टप्रद आहे. अशाप्रकारे चिंतन करणाऱ्या साधकाला संसारापासून भीती उत्पन्न होते. निर्वेद भाव अर्थात वैराग्यभाव प्राप्त होतो. आणि वैराग्य प्राप्त झाल्यावर संसाराचा प्रवाह कमी होतो. संसाराच्या स्वरूपाचा पुन्हा पुन्हा विचार करणे म्हणजे 'संसारानुप्रेक्षा' आहे आणि संसारापासून विरक्त होणे त्याचे वास्तविक फळ आहे.८२
'संसार' याचा अर्थच 'संसरण', 'परिभ्रमण' असा आहे. जो परिभ्रमण करतो तो फुटबॉलप्रमाणे भूमीवर पडताच दुसरीकडे फेकला जातो. त्याला इष्ट आणि अनिष्ट वस्तूचा संयोग होतोच. परंतु मोह आणि अज्ञान यामुळे जीव इष्ट वस्तूच्या प्राप्तीमध्ये सुख आणि अनिष्ट व्यक्ती किंवा वस्तूच्या प्राप्तीमध्ये दुःखाचा अनुभव करतो. तत्त्वतः कोणतीच वस्तू सुख अथवा दुःख याचे कारण होऊ शकत नाही. ज्ञानी पुरुष सर्व वस्तूंच्या संयोगाला दुःखाचे कारण मानून नेहमी त्यापासून दूर निर्वेदभावामध्ये स्थिर राहतात.
जगात दोन गंतव्य आहेत. एक 'संसारा'चा मार्ग आणि दुसरा 'मोक्षा'चा मार्ग. आचार्य वट्टकेरांचे कथन आहे की जो जीव मिथ्यात्वाने अर्थात आत्मविपरीत श्रद्धेने युक्त आहे तो वीतराग प्रभूद्वारा निरूपति मोक्षसाधनेच्या मार्गाला पाहू शकत नाही. त्याची दृष्टी संसाराकडेच राहते. ती भयंकर कुटिल जंगलाप्रमाणे दुर्गम आहे. यात प्राणी स्वतःला विसरून भ्रमण करीतच राहतो. द्रव्य, क्षेत्र, काळ आणि भाव यांच्या दृष्टीने संसार चार प्रकारचा आहे. त्याला सहा अनुयोगांद्वारे समजून घेतले पाहिजे असे ग्रंथकारांचे मत आहे.
प्रथम अनुयोग - संसार काय आहे ? आपण पाहिले आहे की संसरण करणे म्हणजे 'संसार' आहे. हा चार गतींमध्ये भ्रमणशील आहे.