________________
(३०९)
चार पदार्थांना शरण जायला पाहिजे. अरिहंत देव, सिद्ध, परमात्मा, निष्परिग्रही साधू आणि केवली प्ररूपित दयामय धर्म यांना शरण गेल्याशिवाय आत्मा निर्मळ होणार
नाही. ५७
मनुष्याला व्यवहार पूर्ण करण्यासाठी लौकिक शरण ग्रहण करावी लागते परंतु ते केवळ सामान्य आवश्यकतेचीच पूर्ती करू शकतात. शाश्वत सिद्धी मिळविण्यासाठी तर त्यांचीच शरण घेतली पाहिजे, ज्यांनी स्वतः ती सिद्धी प्राप्त केली आहे.
आचार्य अकलंकदेव यांनी दोन प्रकारच्या शरणांचे वर्णन केले आहे. लौकिक आणि लोकोत्तर. ती प्रत्येकी जीव, अजीव आणि मिश्र यांच्या भेदाने तीन तीन प्रकारची आहे.
राजा अथवा देवता इत्यादी लौकिक जीव शरण आहे. कोट किल्ले इत्यादी लौकिक अजीव शरण आहे आणि गाव, नगर इत्यादी लौकिक मिश्र शरण आहे.
पंचपरमेष्टी लोकोत्तर जीव शरण आहे, त्यांचे प्रतिबिंब इत्यादी लोकोत्तर अजीव शरण आहे आणि धर्मोपकरणसहित साधू लोकोत्तर मिश्र शरण आहे. ५८ परंतु जन्म, जरा, रोग, मृत्यू, प्रिय वियोग, अप्रिय संयोग इत्यादी दुःखामध्ये परिभ्रमण करणाऱ्या जीवाला कोणीच शरण नाही. ज्याला तो आपले मानतो असे शरीर सुद्धा परिपुष्ट असेल तरच तो भोजन करू शकतो, अपरिपुष्ट दुःखी आणि रोगी शरीर भोजनही करू शकत नाही. त्याचप्रमाणे प्रयत्नाने संचित केलेले धन, वैभव भवांतरात बरोबर येत नाही. ज्यांनी सुखाला आणि दुःखाला समान रूपात बाटून घेतले आहे असे मित्र सुद्धा मृत्यूच्या वेळी रक्षण करू शकत नाही. केवली प्ररूपित धर्मच ह्या दुःखरूपी महासागराला पार करण्यासाठी उपायरूप आहे. तोच मित्र आणि तोच नेहमी बरोबर राहणारा आहे. अन्य कोणीच शरणरूप नाही. अशाप्रकारे भावना म्हणजे अशरण अनुप्रेक्षा आहे. मी नेहमी अशरण आहे असा विचार करून जीव अतिशय उद्विग्न होतो आणि त्याला संसाराला कारणभूत पदार्थामध्ये ममत्व राहत नाही. आणि तो सर्वज्ञ प्रणीत मार्गातच प्रयत्नशील राहतो. ५९
मनुष्य ज्याला अत्यंत सुखी आणि उच्च स्थानीय मानतो ते कोणीच स्वतःला या विक्राल काळापासून वाचवू शकत नाही.
या संसारामध्ये देवांचा राजा 'इंद्र' त्याचाही विनाश होतो आणि जेथे हरिहर ब्रह्मा इत्यादी देवसुद्धा काळाचे ग्रास होतात. ६० ज्यांची फार मोठी शक्ती मानली जाते त्यांच्यासमोर मनुष्याची तर गणनाच काय ?