________________
(२११)
कविता इत्यादींना स्वनावाने प्रचारीत किंवा प्रसारीत करणे सुद्धा चोरी आहे. तसेच एखाद्या व्यक्तीला त्याचे अधिकार न देणे ही सुद्धा चोरी आहे.
कोणत्याही जाती, धर्म, पंथ, देशाचा मनुष्य असो त्याच्या मानवीय अधिकारांचे
अपहरण करणे, धर्मस्थानात येऊ न देणे, देवदर्शन अथवा संताच्या चरणस्पर्शापासून वंचित ठेवणे, त्याच्या बरोबर अमानवी व्यवहार करणे ही सुद्धा चोरीच आहे. तसेच हा केवळ राजनैतिक अपराधच आहे असे नाही तर नैतिक व आध्यात्मिक पतनसुद्धा आहे.
चोरीची अनेक कारणे आहेत. त्यातील एक कारण म्हणजे वस्तूचा अभाव असणे हे आहे. जीवननिर्वाहाचे साधन सुलभ नसेल तर काही प्रामाणिक व्यक्ती सुद्धा विवश होऊन चोरी करण्याचा प्रयत्न करतात. म्हणून समाजात अभावाची स्थिती असताना सुद्धा त्याला समाप्त करण्याचा प्रयत्न न करणे आणि आपल्या शक्तीचा समविभाग न करणे ही सुद्धा चोरी आहे. शेजारचे कुटुंब उपाशी आहे ही गोष्ट माहीत असताना सुद्धा स्वतः ऐश आरामात राहणे व चटपटीत पदार्थ मिष्टान्न खाणे, समाजाची, राष्ट्राची आणि मानवजातीची चोरी आहे.
चोरी करण्याविषयी सतत चिंतन करणे, चोरी करून आनंद मानणे, दुसऱ्यांकडून चोरी करवून घेणे, चोरीत लाभ झाला तर खुश होणे, चोरीच्या कामात कलाकौशल्य दाखविणाऱ्यांची प्रशंसा करणे इत्यादी विचार स्तेयानुबंधी भावना आहे. ही भावना अत्यंत निंदनीय आहे.
प्रमादी परिश्रम न करताच धन मिळवू इच्छितो आणि त्यात तृप्ती मानतो. पापोदयामुळे त्याला चोरीशिवाय दुसरा कोणताच उपाय दिसत नाही म्हणून तो चौर्य कर्मात संलग्न राहतो. असे हे पापी विचार करतात की, वादळाने घेरलेल्या आकाशाचे वातावरण, अंधारी रात्र असेल तेव्हा काळे वस्त्र धारण करून गुप्तपणे जाऊन घर फोडून धन घेऊन येईन. माझा सामना करण्याची शक्ती कोणाचीही नाही. मी शस्त्रकलेत प्रवीण आहे, मी एकाच झटक्यात अनेक तुकडे करून असा पळून जाईन की मला कोणीही पकडू शकणार नाही. मी अनेक विद्या जाणतो. मी सर्वांना निद्राधीन करू शकेन. मोठमोठ्या साखळ्या, कुलूप झटक्यात तोडून टाकीन. अंधारात प्रकाशाप्रमाणे सर्व काही पाहू शकतो. सेनेला स्तंभित करू शकतो. इत्यादी अनेक कलेत माझी बरोबरी कोणीही करू शकणार नाही. आता मी थोड्याच काळात धनवानांचा संहार करून ऋद्धी-सिद्धी यांचा स्वामी होईन, इत्यादी विविध विचारांना अंतःकरणात स्थान देणे ही स्तेयानुबंधी भावना आहे.