________________
जीवन जगण्याची कला
बाहेर उपभोगण्यासाठी कितीतरी एषआरामाच्या गोष्टी आहेत! या लाख रुपयांच्या डबलडेकर बसमध्ये आपण आरामात बसून इथून चर्चगेटपर्यंत जाऊ शकतो. शिवाय त्यातल्या गाद्या तर किती मऊ! आपल्या घरी पण इतक्या सुंदर गाद्या नसतात! आता इतके चांगले पुण्यकर्म आहे तरी पण उपभोगता येत नाही. नाही तर हिंदुस्तानातील लोकांच्या नशिबात लाख रुपयांची बस कुठून येणार? जेव्हा या मोटारीतून जातात तेव्हा धूळ उडते का? नाही. रस्त्यावर धूळच नसते. चालतात तरी पायाला धूळ लागत नाही, अरे पूर्वी बादशाहांच्या काळातही धुळीचे रस्ते होते. ते बाहेरून येत असत तेव्हा धुळीने माखलेले असत! आणि आजकालच्या पिढीला तर बादशाहपेक्षाही जास्त सुखसुविधा आहे पण उपभोगताच येत नाही ना. छान बसमध्ये बसला असेल तरी डोक्यात दुसरेच चक्कर चालू असते!
संसार सहजपणे चालतो, तिथे...
खरे म्हणजे दु:ख नसतेच आणि जे आहे ते अज्ञानतेचेच दुःख आहे. या जगात किती जीव आहेत? असंख्य जीव आहेत! पण कोणाचीही तक्रार नाही की आमच्याकडे दुष्काळ पडला आहे म्हणून! आणि हे मूर्ख लोक प्रत्येक वर्षी तक्रार करीत राहतात! या समुद्रात कोणी प्राणी उपासमारीने मेला असे घडते का कधी? हे कावळे वगैरे उपासमारीने मरतात का? नाही. ते उपासमारीमुळे मरत नाहीत. ते कुठे टक्कर झाल्याने, एक्सिडन्ट झाल्याने किंवा आयुष्यकर्म पूर्ण झाले असेल तर मरतात. कोणी कावळा दुःखी दिसला का? उपासमारीने कृश झालेला दुबळा कावळा तुम्ही पाहिला आहे का कधी? मग या कुत्र्यांना झोपेच्या गोळ्या खाव्या लागतात? ते तर आरामशीर कुठेही झोपतात. फक्त हा करंटा मनुष्यप्राणीच झोपेच्या वीस वीस गोळ्या खातो. झोप तर निसर्गाची देणगी आहे. झोपेत तर खूप आनंद वाटतो! हे डॉक्टर तर बेशुद्ध होण्याच्या गोळ्या देतात. गोळ्या खाऊन बेशुद्ध होणे हे दारू पिण्यासारखेच आहे.