________________
समजदारीने शोभेल गृहसंसार
१११
सुधारण्यापेक्षा सुधरण्याची गरज
प्रश्नकर्ता : स्वतःची चूक आहे असे समजून पत्नीला सुधारता येणार नाही का ?
दादाश्री : दुसऱ्याला सुधारण्यासाठी स्वतःलाच सुधरण्याची आवश्यकता आहे. दुसऱ्या कोणाला सुधारु शकत नाही. जे दुसऱ्याला सुधारण्याचा प्रयत्न करतात ते सगळे अहंकारी आहेत. स्वतः सुधरलो म्हणजे समोरचाही सुधरतो. मी असेही लोक पाहिले आहेत की, जे बाहेर दुसऱ्यांना सुधारण्याचा प्रयत्न करतात पण घरात बायको पुढे त्यांची काहीच अब्रू नसते. आई समोरही अब्रू नसते. ही कशी माणसे आहेत ही ? आधी तू सुधर. मी याला सुधारेल, मी त्याला सुधारेल हा खोटा अहंकार आहे. अरे तूच धड नाहीस, तर तू दुसऱ्यांना काय सुधारणार ? प्रथम स्वतः शहाणे होण्याची गरज आहे. 'महावीर' होण्यासाठीच प्रयत्न करीत होते म्हणून त्यांचा आजही एवढा प्रभाव आहे! पंचवीसशे वर्षानंतर सुद्धा त्यांचा प्रभाव ओसरलेला नाही !!! आम्हीही कोणाला सुधारत नाही.
सुधारण्याचा अधिकार कोणाला ?
तुम्हाला दुसऱ्यांना सुधारण्याचा काय अधिकार आहे ? ज्याच्यात चैतन्य आहे त्याला सुधारण्याचा तुम्हाला काय अधिकार आहे? हे कपडे मळकट झाले तर त्यांना स्वच्छ करण्याचा अधिकार तुम्हाला आहे. कारण तिथे समोरून कोणत्याही प्रकारचे रिॲक्शन (प्रतिक्रिया) येणार नाही परंतु ज्यात चैतन्य आहे ते तर रिअॅक्शन करणारे आहे, अशांना तुम्ही कसे काय सुधारणार? जिथे स्वतःचीच प्रकृती सुधरत नाही तिथे दुसऱ्यांची प्रकृती कशी सुधारणार ? स्वतःच एक भोवरा आहे. त्याचप्रमाणे इतर सर्वजण पण भोवरेच आहेत. कारण ते सर्व प्रकृतीच्या ताब्यात आहेत, ते अजून पुरुष झालेले नाहीत. पुरुष झाल्यानंतर 'पुरुषार्थ' उत्पन्न होतो. तो पुरुषार्थ तुम्ही अजून पाहिलेलाच नाही.