________________
समजदारीने शोभेल गृहसंसार
१२१
दादाश्री : व्यवहारात टोकावे लागते, पण ते अहंकारपूर्वक होत असते म्हणून नंतर त्याचे प्रतिक्रमण करायला हवे.
प्रश्नकर्ता : टोकले नाही तर तो डोक्यावर बसेल, नाही का?
दादाश्री : टोकावे तर लागते, पण टोकता आले पाहिजे. योग्य तहेने बोलता येत नाही, व्यवहार हाताळता येत नाही म्हणून अहंकारपूर्वक बोलले जाते. म्हणून लगेच त्याचे प्रतिक्रमण केले पाहिजे. तुम्ही समोरच्याला टोकता तेव्हा त्याला वाईट तर वाटते, पण तुम्ही त्याचे सतत प्रतिक्रमण करीत राहिले तर सहा महिन्यानंतर, बारा महिन्यानंतर तुमची वाणी अशी निघेल की त्याला गोड वाटू लागेल. आता तर टेस्टेड वाणी बोलली पाहिजे. अनटेस्टेड वाणी बोलण्याचा तुम्हाला अधिकार नाही. तुम्ही अशा प्रकारे प्रतिक्रमण कराल तर काही जरी झाले तरी नंतर गोष्ट सरळ होईल.
अबोला धरून तर ताण वाढतो प्रश्नकर्ता : अबोला धरून गोष्ट टाळल्याने प्रश्न मिटतो का?
दादाश्री : नाही मिटत. तुम्हाला तो माणूस भेटेल तेव्हा 'तुम्ही कसे आहात? कसे चालले आहे ?' अशी विचारपूस करावी. तो जर भडकला तर तुम्ही शांत राहून समभावेने निकाल करावा. कधी ना कधी तर प्रश्न सोडवावाच लागेल ना? अबोला धरल्याने काय प्रश्न मिटला? ते प्रश्न मिटला नाही म्हणून तर अबोला धरावा लागला. अबोलपणा म्हणजे ओझे, जो प्रश्न लटकत पडला त्याचे ओझे. आपण त्याच्याकडे जाऊन त्याला विचारले पाहिजे की, 'जरा थांबा ना, माझे काही चुकले असेल तर मला सांगा. मी खूप वेळा चुकतो. तुम्ही तर फार हुशार आहात. शिकले-सवरलेले आहात म्हणून तुमच्याकडून चुका होणार नाहीत, पण मी अडाणी, कमी शिकलेलो म्हणून माझ्याकडून खूप चुका होतात.' असे स्वत:ला हिणवले म्हणजे तो खुश होईल.