________________
१६२
क्लेश रहित जीवन
म्हणून विनय नको का ठेवायला? तुम्ही सांगाल की, 'इथे झोपू नका, तिथे झोपा,' तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे मला तिथे झोपायला हवे. दोन वाजता जेवायला वाढले तरी शांतपणे जेवायचे. ताटात जे वाढतील ते मुकाट्याने खाल्ले पाहिजे. तिथे तक्रार करता कामा नये. कारण 'गेस्ट' आहोत. आता जर पाहुणा स्वयंपाकघरात जाऊन कढीत चमचा ढवळू लागला तर ते योग्य होईल का? घरात ढवळाढवळ करू लागलात तर तुम्हाला घरात कोण ठेवून घेईल? जेवणात बासुंदी असेल तर खाऊन घ्यावी तिथे असे सांगू नये की 'आम्ही गोड खात नाही.' जेवढे वाढले तेवढे आरामात खायचे. खारट वाढले तर खारट खावे. जास्त आवडत नसेल तर कमी खायचे, पण खायचेच! पाहुण्याचे सगळेच नियम पाळा. पाहुण्याने राग-द्वेष करुन चालणार नाही. पाहुणा राग-द्वेष करू शकतो का? तो तर विनयपुर्वकच राहतो ना?
आम्ही तर 'गेस्ट' प्रमाणेच राहतो. आमच्यासाठी सगळ्याच वस्तू येतात. आपण ज्यांच्या घरी 'गेस्ट' म्हणून गेलो असू त्यांना त्रास द्यायचा नाही. आमच्यासाठी सगळ्याच वस्तू घरबसल्या येतात. आठवण झाली की लगेच हजर होतात आणि समजा नाही मिळाल्या तरीही मला काही हरकत नाही. कारण आपण त्यांच्या घरी 'गेस्ट' आहोत. कुणाच्या घरी? तर निसर्गाच्या घरी! निसर्गाची मर्जी नसेल तर आपण समजावे की हे माझ्या हितासाठी आहे. आणि निसर्गाची मर्जी असेल तरीही समजावे की, हे पण माझ्या हितासाठीच आहे. आपल्या हातात करण्याची सत्ता असती तर एका बाजूला दाढी उगवली आणि दुसऱ्या बाजूला नाही उगवली तर आपण काय केले असते? आपल्या हातात करायची सत्ता असती तर सगळा गोंधळ करुन ठेवला असता. पण हे सर्व निसर्गाच्या हातात आहे. निसर्गाची कुठेही चूक होत नाही. सगळे पध्दतशीर असते. पाहा ना, चावण्याचे दात वेगळे, सोलण्याचे दात वेगळे, चघळण्याचे वेगळे, पाहा तरी! किती सुंदर व्यवस्था आहे ! जन्मत:च पूर्ण शरीर मिळते. हात, पाय, नाक, कान, डोळे सगळे मिळते पण तोंडात हात घातले तर दात नसतात,