________________
आदर्श व्यवहार
१७१
आदर्श व्यवहारामुळे आपल्याकडून कुणालाही दुःख होत नाही. आपल्याकडून कुणालाही दुःख होऊ नये एवढेच पाहायचे आहे. तरीदेखील आपल्याकडून कुणाला दुःख झालेच तर त्वरित प्रतिक्रमण करून घ्यावे. लोक आपल्याशी जसे वागतात तसे आपण वागायचे नाही. व्यवहारात पैशांची देणघेण होते ती होणार, तो तर सामान्य व्यवहार आहे, सामान्य रिवाज आहे, त्यास आम्ही व्यवहार म्हणत नाही. आपण फक्त आपल्याकडून कुणाला दुःख होत नाही एवढेच जपायचे आणि कदाचित कोणाला दुःख झालेच तर ताबडतोब प्रतिक्रमण करायचे यालाच आदर्श व्यवहार म्हणतात!
आमचा व्यवहार आदर्श असतो. आमच्याकडून कधी कुणाला दःख होईल असे घडतच नाही. कोणाच्याच खात्यात माझ्या नावावर त्रास दिला अशी नोंद होत नाही. आम्हाला कोणी त्रास दिला आणि त्याबदल्यात आम्ही पण त्रास दिला तर आमच्यात आणि तुमच्यात काय फरक? आम्ही सरळ असतो, समोरच्याला ओटीत घालून आम्ही सरळ असतो. म्हणून समोरच्याला वाटते की दादा कच्चे (भोळे) आहेत, हो, कच्चे बनून सुटून जाणे चांगले पण पक्के बनून त्याच्या तुरुंगात जाणे हे चुकीचे. असे करण्याची काय गरज? एकदा आम्हाला आमचा भागीदार म्हणाला होता की, 'तुम्ही खूप भोळे आहात.' तेव्हा मी म्हणालो की 'मला भोळे म्हणणारा स्वतःच भोळा आहे.' त्यावर तो म्हणाला की 'तुम्हाला खूप जण फसवून जातात.' मग मी त्याला म्हणालो की आम्ही जाणून बुझून फसवून घेतो.'
आमचा व्यवहार संपूर्ण आदर्श व्यवहार असतो. ज्याच्या व्यवहारात थोडी देखील कमतरता असेल तो मोक्षासाठी लायक म्हटला जाणार नाही.
प्रश्नकर्ता : ज्ञानींच्या व्यवहारात दोन व्यक्तींमध्ये भेदभाव केला जातो का?