________________
१६४
क्लेश रहित जीवन
व्यापार आहे. खरे म्हणजे व्यापार देखील तुमच्या हातात नाहीच. तुम्ही फक्त मानता की मी व्यापार करतो. आणि म्हणूनच विनाकारण हायहाय करीत राहतात! दादरहून बॉम्बे सेन्ट्रल जायला टॅक्सी केली की मनात धडक लागेल अशी सारखी धास्ती वाटत राहते. अरे कोणीच धडकणार नाही. तू आपला समोर बघून चाल. तुझे कर्तव्य किती? तर फक्त समोर बघून चालायचे एवढेच. खऱ्या अर्थाने तर तेही तुझे कर्तव्य नाही. निसर्गच ते तुझ्याकडून करवून घेत आहे. पण समोर पाहत नाही आणि विनाकारण ढवळाढवळ करीत राहतो. निसर्ग तर इतका चांगला आहे! अरे शरीरात इतका सुंदर कारखाना चालू आहे तर बाहेर का नाही चालणार? बाहेर काहीच चालवायची गरज नाही. बाहेर काय चालवायचे आहे ?
प्रश्नकर्ता : कोणी चुकीचे वागत असेल तर ती सत्ता देखील त्याच्या हातात नाही?
दादाश्री : नाही, ती सत्ता नाही, आणि चुकीचे होईल असेही नाही, पण त्याने बरे-वाईट भाव केले म्हणून हे असे चुकीचे घडले. स्वत:च निसर्गाच्या संचालनात ढवळाढवळ केली आहे, नाही तर हे कावळे, कुत्रे या जनावरांचे कसे (जीवन) आहे? दवाखाना नको, कोर्ट नको, हे प्राणी त्यांची भांडणे कसे मिटवतात? दोन बैल भांडतात, खूप भांडतात पण सुटल्यानंतर ते काय कोर्ट शोधायला जातात का? दुसऱ्या दिवशी पाहिले तर दोघेही मजेत हिंडत असतात! आणि या मूर्खाचे दवाखाने असतात, कोर्टस् असतात आणि तरीही सदा दुःखीच! या लोकांची तर नेहमीच रडबोंबल सुरु असते. अशा लोकांना अकर्मी म्हणावे की सकर्मी म्हणावे? या चिमण्या, कबुतरे, कुत्रे सगळे किती सुंदर दिसतात! ते काय हिवाळ्यात आयुर्वेदिक जडीबुटी टाकलेले हिवाळीपाक खातात का? आणि हे लोक तर असे सर्व खाऊनही रूपवान दिसत नाहीत. कुरूपच दिसतात. या अहंकारामुळे सुंदर मनुष्य सुद्धा कुरूप दिसतो. म्हणजे आपले कुठेतरी चुकत असावे, असा विचार करायला नको का?