________________
समजदारीने शोभेल गृहसंसार
'बायकोशी' सगळे संबंध तोडायचे असतील तर गोष्ट वेगळी आहे, पण बायकोशी परत बोलायचे असेल तर मग मधली सर्व भाषा पूर्णपणे चुकीची आहे. आमच्या हे लक्षातच असते की, दोन तासानंतर पुन्हा बोलायचे आहे, म्हणून आम्ही किटकिट करत नाही. तुम्हाला जर तुमचे मत कायम ठेवायचे असेल तर गोष्ट वेगळी. तुमचे मत बदलणार नसेल तर मग तुम्ही जे केले ते बरोबर आहे. पुन्हा तिच्याबरोबर बसणारच नसाल तर ठीक आहे. परंतु उद्या परत तिच्यासोबत बसून जेवायचे असेल तर मग काल केलेल्या नाटकाचे काय ? हा विचार करायला नको का ? हे लोक तीळ भाजून पेरतात म्हणून केलेली सगळी मेहनत वाया जाते. भांडण होते तेव्हा हे लक्षात यायला हवे की, ही कर्मच आपल्याला नाचवतात. मग या नाचावर ज्ञानाचा उपयोग करून इलाज केला पाहिजे.
प्रश्नकर्ता: दादा, हे तर भांडण करणाऱ्या दोघांनाही समजायला हवे ना ?
दादाश्री : नाही, इथे तर 'सब सब की संभालो' तुम्ही फक्त तुमचे पाहायचे. तुम्ही सुधरले म्हणजे समोरचा आपोआप सुधारेल. ही तर सद्विचारणा आहे की काही वेळानंतर पुन्हा सोबतच बसायचे आहे मग भांडण कशासाठी? लग्न केले आहे तर मग भांडणं का ? तुम्ही काल काय झाले ते विसरता, पण आम्हाला तर 'ज्ञानात' सर्व हजरच असते. ही तर एक सद्विचारणा आहे म्हणून ज्याने आत्मज्ञान घेतले नसेल त्यालाही हे उपयोगी पडेल. अज्ञानामुळे वाटते की बायको डोक्यावर बसेल. कोणी आम्हाला कोणी विचारले तर आम्ही सांगू की, 'तू पण भोवरा आहेस आणि ती पण भोवरा आहे, मग ती डोक्यावर कशी बसेल? ते काय तिच्या हातात आहे ? ते तर 'व्यवस्थित शक्तीच्या ' ताब्यात आहे. आणि ती कुठे तुमच्या डोक्यावर चढून बसणार आहे ? तुम्ही जर नमते घेतले म्हणजे तिच्याही मनाला समाधान वाटेल की आता माझा नवरा माझ्या ताब्यात आहे ! तिलाही बरे वाटेल.
१२९