________________
७६
क्लेश रहित जीवन
जेव्हा ती तुम्हाला त्रास देईल तेव्हा तुम्ही भिंतीसारखे व्हा. म्हणजे तुमच्या आतील देव तुम्हाला 'मदत' करेल.
__ जो भोगतो त्याचीच चूक प्रश्नकर्ता : कित्येकजण असे असतात की, आपण त्यांच्याशी कितीही चांगले वागलो तरीही ते आपल्याला समजून घेत नाहीत.
दादाश्री : ते समजून घेत नसतील तर त्यात आपलीच चूक आहे की आपल्याला समजून घेणारा का नाही भेटला! याच्याशीच आपली गाठ का पडली? जेव्हा-जेव्हा आपल्याला काही दुःख भोगावे लागते ते सर्व आपल्याच चुकांचा परिणाम आहे.
प्रश्नकर्ता : म्हणजे आमची कर्मच अशी आहेत असे समजावे का?
दादाश्री : हो नक्कीच. आपल्या चुकीशिवाय आपल्याला भोगावे लागणारच नाही. या जगात कोणीही असे नाही की जो आपल्याला, किंचितमात्र देखील दुःख देऊ शकेल आणि दुःख देणारा आहे तर ती आपलीच चूक आहे. तत्त्वाचा दोष नाही, तो तर केवळ निमित्त आहे. म्हणून जो भोगतो त्याची चूक.
कुणी नवरा-बायको दोघेजण आपापसात खूप भांडत असतील, नंतर थोड्या वेळाने दोघेही झोपायला गेल्यानंतर चुपचाप बघायला गेलो तर बायको गाढ झोपलेली असते आणि नवरा मात्र या कुशीवरून त्या कुशीवर तळमळत पडलेला असतो, म्हणून आपण समजावे की सगळी नवऱ्याचीच चूक आहे, बायकोला तर काही त्रास झालेला दिसत नाही. ज्याची चूक असेल तोच भोगतो. आणि त्यावेळी जर असे आढळले की भाऊ निवांतपणे झोपलेले आहेत आणि बायको अस्वस्थपणे जागीच आहे, तर समजावे की चूक बायकोचीच आहे. 'भोगतो त्याची चूक.'