________________
समजदारीने शोभेल गृहसंसार
दादाश्री : या भिंतीबरोबर भांडायचे ठरवले तर किती वेळ भांडू शकाल? या भिंतीवर कधी डोके आपटले गेले तर आपण त्या भिंतीचे काय करणार? डोके आपटले गेले म्हणजे आपले भिंतीशी भांडण झाले, मग काय भिंतीला मारायचे का? त्याचप्रमाणे जे सतत भांडायला पुढे असतात ते सगळे भिंतीसमानच आहेत! म्हणून त्यांच्यात दोष पाहून काय फायदा? आपण स्वतःहूनच समजून घेतले पाहिजे की हे सगळे भिंतीसारखेच आहेत, एकदा हे सगळे समजले की मग कसलीच अडचण नाही.
प्रश्नकर्ता : आपण मौन (गप्प) राहिलो तर समोरच्यावर त्याचा उलटाच परिणाम होतो, त्याला असे वाटते की याचाच दोष आहे म्हणून तो जास्त भांडण करतो.
दादाश्री : तुमची अशी गैरसमजूत आहे की, मी मौन राहिलो म्हणून हे असे झाले. रात्री बाथरुमला जायला तुम्ही उठलात आणि अंधारात भिंतीवर डोके आपटले तर ते तुम्ही गप्प राहिल्यामुळे झाले का?
मौन राहा किंवा बोला त्याच्यावर काहीच परिणाम होत नाही. याचा काहीच संबंध नाही. आपण मौन राहिल्याने समोरच्यावर काही परिणाम होतो असेही नाही किंवा आपल्या बोलल्याने समोरच्यावर काही परिणाम होतो असेही नाही. 'ओन्ली सायन्टिफिक सरकमस्टेन्शियल एविडन्स' मात्र वैज्ञानिक संयोगिक पुरावा आहे. कोणाची कसलीही सत्ता नाही. अजिबात सत्ता नाही, असे हे जग आहे. यात कोणी काय करणार आहे? या भिंतीला जर सत्ता असती तर यालाही सत्ता राहिली असती! आपल्याला या भिंतीशी भांडायची सत्ता आहे का? मग समोरच्यावर ओरडण्यात काय अर्थ? त्याच्या हातात सत्ताच नाही ना! म्हणून तुम्ही भिंतीसारखे व्हा ना! तुम्ही बायकोला टोक-टोक करता तेव्हा तिच्या आत असलेला देव (शुद्धात्मा) नोंद करतो की हा मला नेहमी त्रास देतो!