________________
(२५)
आहे, इच्छा व लोभाने रहित आहे, तो लहान मोठ्या पापाचे शमन करतो तो श्रमण आहे. ७
९. श्रमण संस्कृतीच्या मुख्य दोन धारा
श्रमण संस्कृतीच्या मुख्य दोन धारा आहेत अ) जैन संस्कृती, ब) बौद्ध
संस्कृती
९ अ ) जैन संस्कृती
श्रमण संस्कृतीची एक शाखा जैन धर्माच्या रूपात विकसित झाली. जैन धर्माचा ऐतिहासिक दृष्टीने जितका पाहिजे तितका खोलवर अभ्यास अजून झालेला नाही. म्हणून त्यासंदर्भात अनेक भ्रामक कल्पना दृढ झाल्या आहेत. काहीजण तर असे मानतात की, ज्याप्रमाणे बौद्ध धर्माची संस्थापना बुद्धांनी केली, त्याचप्रमाणे जैन धर्माचे प्रवर्तन भगवान महावीरांनी केले. काही विद्वान भगवान पार्श्वनाथांच्या कालखंडापर्यंत पोहोचले. परंतु त्याच्यापूर्वी जैन धर्माचे अस्तित्व त्यांनी मानलेले नाही. ह्या संदर्भात डॉ. हर्मन जेकोबी इत्यादी पाश्चात्य विद्वानांनी विशेष संशोधन केले, आगम ग्रंथांचा अभ्यास केला. भारतीय विद्वानांनीसुद्धा तटस्थ भावनेने जेव्हा सूक्ष्मरूपात अध्ययन केले तेव्हा त्यांनी हे स्वीकारले की, जैन धर्मात भगवान पार्श्वनाथांच्या अगोदर बावीस तीर्थंकर होऊन गेले. त्यांपैकी पहिले तीर्थंकर ऋषभदेव होत.
जैन परंपरा तर ह्याच्यासुद्धा पुढे जाते. ह्या चोवीस तीर्थंकरांप्रमाणे त्यांच्या अगोदरसुद्धा अनेक वेळा चोवीस तीर्थंकर होऊन गेले. यावरून हे सिद्ध होते की, जैन धर्म अनादी आहे. त्याचा आरंभ आपल्याला सांगता येणार नाही. परंतु भगवान महावीर ह्या युगाचे अंतिम तीर्थंकर होते. साधू, साध्वी, श्रावक, श्राविकारूप संघाला तीर्थ म्हणतात आणि या चार तीर्थांची स्थापना जे करतात त्यांना तीर्थंकर म्हणतात. जेव्हा साधना परिपक्व होते तेव्हा ज्ञानावरणीय, दर्शनावरणीय, मोहनीय आणि अंतराय कर्माचा क्षय झाल्याने ते वीतराग, सर्वज्ञ, केवली होतात तेव्हा ते धर्मोपदेश देतात.
असे म्हटले जाते की भगवान महावीरांची देशना अर्धमागधी प्राकृतमध्ये होत होती. त्यांची वाणी आर्य-अनार्य, द्विपद, चतुष्पद, मृग, पशू, पक्षी, सरीसृप इत्यादी सर्व प्राण्यांसाठी आपल्या आपल्या हितकारी, कल्याणकारी सुखद भाषेत परिणत होत होती. तीर्थंकरांच्या चौतीस अतिशयामधील भाषेचा एक अतिशय आहे. ८ अतिशय म्हणजे विशेषता.