________________
गुरु-शिष्य
शिक्षकांनी तुला (ज्ञान) दिले आणि तू ते घेतलेस. मग ते ज्ञान तू दुसऱ्यांना दिलेस. देणेघेणे हा जगाचा स्वभावच आहे. शिक्षकांनी तुम्हाला ज्ञान दिले नव्हते का? नंतर तुम्ही ते ज्ञान दुसऱ्यांना दिले. असा हा देण्या-घेण्याचा स्वभाव आहे.
प्रश्नकर्ता : पण स्वत:स आपोआप ज्ञान होते की नाही?
दादाश्री : कुणा एखाद्यालाच आपोआप ज्ञान होते पण ते अपवाद स्वरुपात होते आणि तेही या जन्मात जरी गुरू मिळाले नसतील परंतु पूर्वजन्मात तर गुरू नक्कीच भेटलेले असतात. म्हणजे हे सर्व निमित्ताच्या अधीन असते. आमच्यासारखे कुणी निमित्त भेटले तर तुमचे काम होऊन जाते. तोपर्यंत तुम्हाला डेव्हलप (प्रगत) व्हावे लागते आणि मग 'ज्ञानी पुरुषाचे' निमित्त मिळाले तर त्या निमित्ताच्या अधीन सर्व प्रकट होते.
प्रश्नकर्ता : म्हणजे मनुष्य स्वयं कधीच प्राप्त करू शकत नाही!
दादाश्री : स्वयं काहीच प्राप्त होत नाही. या दुनियेत कोणालाही प्राप्त झालेले नाही. अनुभूती जर आपण स्वतःच करायची असेल तर मग शाळांची गरजच नाही ना! कॉलेजांचीही गरज नाही!
स्वयंबुद्ध सुद्धा सापेक्ष प्रश्नकर्ता : हे तीर्थंकर तर स्वयंबुद्ध म्हटले जातात ना?
दादाश्री : हो. सर्व तीर्थंकर स्वयंबुद्ध असतात पण मागच्या जन्मात गुरूंद्वारे त्यांचे तीर्थंकर गोत्र बांधले गेलेले असते. म्हणून या अपेक्षेने त्यांना स्वयंबुध्द म्हणतात आणि या अवतारामध्ये त्यांना गुरू मिळाले नाहीत म्हणून त्यांना स्वयंबुद्ध म्हणतात. ही सापेक्ष वस्तू आहे. आणि आज जे स्वयंबुद्ध झाले आहेत ते सर्व मागील जन्मात कोणाला तरी (मार्ग) विचारत-विचारत आले आहेत. म्हणजे हे जग विचारुन-विचारुन चालत राहते. आपोआप तर कोणी एखाद्यास, स्वयंबुद्धासच होते, म्हणजे तो अपवाद आहे. अन्यथा गुरूशिवाय ज्ञानच नाही.
प्रश्नकर्ता : असे म्हणतात की ऋषभदेव भगवंतांनी स्वत:ची बंधने स्वत:च तोडली. याचा अर्थ त्यांना दुसऱ्या कोणाची गरज भासली नाही ना?