________________
१०
गुरु-शिष्य
प्रश्नकर्ता : याचा अर्थ शेवटपर्यंत जायचे असेल तरी सुद्धा गुरू
पाहिजे.
दादाश्री : जिथे जायचे असेल तिथे गुरू पाहिजे. आपण इथून गाडी घेऊन जात असू आपल्याला हायवेच्या रस्त्याने जायचे असेल, तेव्हा कुणाला तरी विचारले तर तो बरोबर घेऊन जाईल, नाही तर चुकीच्या रस्त्याने पुढे जाऊ. म्हणजे संसारातही गुरूची आवश्यकता आहे आणि निश्चयात सुद्धा गुरूची आवश्यकता आहे. तर आता 'गुरू म्हणजे काय ? गुरू कोणास म्हणतात' हे समजून घेणे गरजेचे आहे.
ज्यांच्यापासून शिकतो, ते सुद्धा गुरू
प्रश्नकर्ता : तर धर्माच्या बाबतीत एकच गुरू करावा की सर्व ठिकाणी गुरू करावेत ?
दादाश्री : असे आहे की, शिष्यभाव सर्व ठिकाणी ठेवावा. खरोखर तर साऱ्या जगास गुरू बनवावे. झाडाकडून सुद्धा शिकवण मिळते. या आंब्याच्या झाडाचे आपण काय करतो ? आंबे खाण्यासाठी त्यास झोपटतो. तरी सुद्धा ते फळ देते, मार खाऊन सुद्धा फळ देते ! हा त्याचा गुण जर आपल्यात आला तर किती चांगले काम होईल ! झाडात सुद्धा जीवच आहे ना! ते काही लाकूड थोडेच आहे ?
प्रश्नकर्ता : दत्तात्रेयांनी काही प्राण्यांना आपले गुरू बनवले होते, ते कोणत्या अर्थाने ?
दादाश्री : फक्त दत्तात्रेयांनीच नाही, तर सगळेच बनवतात. प्रत्येक माणूस प्राण्यांना गुरू बनवतो पण लोक प्राण्यांना गुरू म्हणत नाही आणि दत्तात्रेयांनी प्राण्यांना गुरू म्हटले ! प्राण्यांना कोणी मारले तर ते पळून जातात, तसेच लोकही शिकले की आपल्याला कोणी मारले तर पळून गेले पाहिजे, लोक पळून जाण्याचे प्राण्यांकडून शिकले आहेत..
आणि फक्त त्या प्राण्यांनाच गुरू मानून निकाल होत नाही, जगातील प्रत्येक जीवाला गुरू बनवा, तरच सुटका होईल. जगातील सर्व जीवांना गुरू कराल, ज्यांच्यापासून जे काही जाणता येईल त्याचा स्वीकार कराल