________________
परमगुरू कोणास म्हणावे ?
एक दिवशी दादाश्री नीरुला सांगत होते, 'नीरुताई, तुम्ही एक शिष्य ठेवा ना!' नीरूने सांगितले 'दादा, आपण आज असे काय बोलत आहात ? आपण तर नेहमी आम्हा सगळ्यांना सांगत असता की मी जगातील जीवमात्रांचा शिष्य बनलो, तेव्हा मला हे ज्ञान प्रकट झाले ! तर आज मला आपण गुरू बनण्यास का सांगत आहात ?' तेव्हा दादाश्रींनी हसत हसत म्हटले, 'पण एक शिष्य ठेवा ना! एक शिष्य ठेवण्यास तुम्हाला काय हरकत आहे ?' नीरूने म्हटले, 'नाही दादा, मलाच आपल्या चरणापाशी, सेवा करीत राहू द्या ना! या शिष्याला मी कोठे सांभाळू ? मला ते परवडणारच नाही' तेव्हा दादाश्री म्हणाले, 'मी काय म्हणतो ते तरी समजून घ्या.' ‘दादा, त्यात काय समजायचे ? मी गुरू कशी बनू शकते ? तेव्हा पुन्हा दादाश्री म्हणाले, 'पण मी काय सांगू इच्छितो ते तरी समजून घ्या ! असे करा ना, या नीरुताईंनाच तुमच्या शिष्य बनवा ना! " ओहोहो ! दादा ! तुम्ही तर कमालच केली ! 'सहजात्म स्वरूप परमगुरूंचे यथार्थ स्पष्टीकरण अनुभवले !' मी गुरूपदावर आणि नीरु शिष्य ! नंतर दादाश्रींनी विशेष स्पष्टीकरण दिले, ‘बघा नीरुताई, एक गुरू त्याच्या शिष्याकडे केवढे लक्ष ठेवतो. काय केल्याने माझा शिष्य पुढे येईल, तिकडेच सतत लक्ष ठेवतो. तसेच तुम्ही आता या नीरुताईंकडे लक्ष ठेवायचे. तुम्ही तर 'शुद्धात्मा' झालात, पण आता या नीरुताईंना वर नाही का आणायचे ?! त्या दिवसापासून दादाश्रींनी माझा आणि नीरुचा गुरू-शिष्याचा व्यवहार सुरु करून दिला ! तेव्हा ज्ञानी पुरुषाच्या गहनतेचे यथार्थ भान झाले की ज्ञानी पुरुषाची दृष्टी गुरू-शिष्याकरिता कुठल्या सीमेपर्यंत असते! कुठे लौकिक गुरू करण्याची गोष्ट व कुठे स्वत:च्याच आत्म्यास गुरूपदावर स्थापित करण्याची गोष्ट! आणि त्यांनाच खरे गुरू, अरे परमगुरू म्हणतात ! दुसरे सगळे बाहेरचे गुरू तर एक-दोन तास उपदेश करून निघून जातात. ते त्यांच्या घरी व आपण आपल्या घरी! नंतर आपण काय त्यांचे ऐकू असे आहोत ? ! त्यांनी सांगितल्याप्रमाणे वागणाऱ्यांपैकी आहोत का ? ! हा तर स्वत:चाच प्रकट झालेला आत्मा स्वत:चा परमगुरू ! जो चोवीस तास हजरच. आणि हजर आहे म्हणून, तो मोक्षमार्गापासून जरा सुद्धा विचलीत होऊ देत नाही, एवढा त्याचा पहारा असतो! असे परमगुरू स्थापित झाले तरच मोक्ष होतो, तोपर्यंत भटकतच राहायचे. गुरू-शिष्याची चरम भेदरेषा ती याला म्हणतात ! !
डॉ.नीरूबहन अमीन