________________
गुरु-शिष्य
१४९
हजार रडणारे असतील, पण शिष्य एक सुद्धा नाही. म्हणजे तुम्ही नक्की काय सांगू इच्छिता?
दादाश्री : माझा कोणी शिष्य नाही. ही काही गादी नाही. गादी असेल तर कोणी वारस होईल ना! गादी असेल तर कोणी वारसदार बनायला येईल ना! तर ज्याचे चालते त्याचेच चालेल. जो सगळ्यांचा, संपूर्ण जगाचा शिष्य बनेल, त्याचे काम होईल! येथे लोक ज्याचा ‘स्वीकार' करतील, त्याचे चालेल!!
असे हे अक्रम विज्ञान हा गुरूचा मार्ग नाही! हा कुठला धर्म नाही किंवा संप्रदाय नाही. मी तर कुणाचाही गुरू बनलो नाही, आणि बनणारही नाही. माझी लक्षणेच गुरू बनण्याची नाहीत. ज्या पदावर मी बसलो आहे, त्या पदावर तुम्हालाही बसवतो. गुरूपद-शिष्यपद मी ठेवलेच नाही. नाही तर सगळीकडे तर लगाम स्वत:जवळच ठेवतात. जगाचा नियम कसा आहे? लगाम सोडत नाहीत. पण येथे तर असे नाही. येथे तर आम्ही ज्या पदावर बसलो आहोत त्या पदावर तुम्हास बसवतो! तुमच्यात आणि माझ्यात वेगळेपण नाही. तुम्हाला जरा वेगळेपण जाणवेल, पण मला वेगळेपण वाटत नाही. कारण तुमच्यात मीच बसलो आहे, त्यांच्यात सुद्धा मी बसलो आहे, मग मला वेगळेपण कसे वाटेल?
आणि खरे तर गुरूपौर्णिमा नसतेच! हे तर दर्शन करण्याच्या निमित्ताने गुरूपौर्णिमा साजरी करतात इतकेच! बाकी, येथे गुरू पौर्णिमा नसते. येथे गुरूही नाही आणि पौर्णिमा सुद्धा नाही! हे तर लघुत्तम पद आहे !! येथे हे सर्व तुमचेच स्वरूप आहे, हे अभेद स्वरूप आहे !
__ आपण वेगळे नाहीच ना! गुरू बनलो तर तुम्ही आणि मी,-शिष्य आणि गुरू असे दोन भेद पडतील. परंतु येथे गुरू-शिष्य म्हटलेच जात नाही ना! येथे गुरू सुद्धा नाही आणि शिष्य सुद्धा नाही. गुरू-शिष्याचा रिवाजच नाही. कारण हे तर अक्रम विज्ञान आहे !!!
जय सच्चिदानंद