________________
गुरु-शिष्य
प्रश्नकर्ता : आजचे मनोविज्ञान असे सांगते की व्यक्तीने बाहेरचा आधार सोडून, स्वत:च्या आधारे जगावे. बाहेरचा आधार, मग तो कुठलाही असो परंतु जिज्ञासू तो आधार घेऊन पंगु बनतो.
दादाश्री : बाहेरचा आधार घेऊन पंगु बनू, असे होऊ नये. बाहेरचा आधार सोडून स्वत:च्या आधारावरच राहावे. परंतु जोपर्यंत स्वतःचा आधार नसेल तोपर्यंत बाहेरचा नैमित्तिक आधार घ्यावा. नैमित्तिक! एखादे पुस्तक निमित्त बनते की नाही बनत ? सर्व काही निमित्तरूप नाही का होत ? म्हणून आजचे मनोविज्ञान जे आधार सोडण्यास सांगते, त्याप्रमाणे काही मर्यादेपर्यंत तो आधार सोडावा परंतु काही ठराविक मर्यादेपर्यंत आधार घ्यावा लागतो, पुस्तकांचा आधार घ्यावा लागतो. दुसरा आधार घ्यावा लागतो, तिसरा आधार सुद्धा घ्यावा लागतो.
एक साहेब म्हणतात की 'गुरू असता कामा नये' मी म्हटले, 'कोणाचे गुरू नव्हते ? ते मला सांगा. मातेने जे संस्कार दिले, ती गुरूच आहे ना ? ' ' असे कर हं बेटा, हे बघ, येथे बघ. मग ती माता गुरू नाही तर कोण आहे ?
प्रश्नकर्ता : बरोबर आहे.
दादाश्री : म्हणून आई ही प्रथम गुरू बनते की, 'बेटा, ही चड्डी घाल, हे असे कर, तसे कर, ' म्हणजे हे सुद्धा बाळाला शिकावे लागते. आई शिकवते. चालणे शिकवते, दुसरे सर्व शिकवते, कोणत्या जन्मात चालला नव्हता? अनंत जन्मात चाललाच आहे, पण पुन्हा तेच तेच शिकायचे.
घरात बायको नसेल, तुम्ही एकटेच असाल आणि कढी बनवायची असेल, तेव्हा सुद्धा कोणाला तरी विचारावे लागेल ना की कढीत काय काय टाकू? ज्यांना-ज्यांना विचारले त्या सगळ्यांना गुरू म्हणतात. अर्थात गुरूची तर जिकडे-तिकडे, पावलोपावली गरज पडतेच. प्रत्येक कामासाठी गुरू तर पाहिजेच. आता जर कोर्टाचे काम निघाले तर या वकीलासच गुरू बनवले, तरच तुमचे काम होईल ना ? म्हणून जिकडे-तिकडे, जिथे जाल तिथे गुरूची आवश्यकता भासेल. प्रत्येक गोष्टीत गुरूची आवश्यकता आहे.