________________
गुरु-शिष्य
२२
सत् साधन सामावले 'ज्ञानींच्या आत म्हणून म्हणतात की सत् साधन हवेत. सत् साधन म्हणजे काय? सत्देव, सत्गुरू आणि सत्धर्म! खरोखर तर शास्त्र सुद्धा सत्साधन नाहीत, मूर्ती सुद्धा सत्साधन नाही. फक्त ज्ञानी पुरुषच सत्साधन आहेत. त्यांच्यात सर्वच सामावले. जिथे सत्देव, सत्गुरू आणि सत्धर्म हे तीन एकत्र असतील त्यांना म्हणतात ज्ञानी पुरुष! जेव्हा विधी करतात तेव्हा ते सत्देव आहेत, बोलतात तेव्हा सत्गुरू आहेत आणि ऐकतात तेव्हा सत्धर्म आहे. तिघांचा संगम एकाच ठिकाणी आहे! एकाचीच आराधना करा, दुसरी भानगडच नको. नाही तर तिघांची आराधना करावी लागेल. येथे तर एकातच सगळे सामावून गेले.
प्रश्नकर्ता : जैनीजममध्ये तर गुरूभावासारखे काही नसतेच.
दादाश्री : नाही, तुम्ही म्हणता तसे नाही. खरे तर देव, गुरू आणि धर्म, यावरच त्यांची स्थापना आहे. सत्देव, सत्गुरू आणि सत्धर्मावर तर त्याचा सर्व आधार आहे. महावीर भगवंतांनी, चोवीस तीर्थंकरांनी काय सांगितले? की गुरूशिवाय या जगात चालणारच नाही. म्हणून सत्देव, सत्गुरू आणि सत्धर्म हे तीन साथीला असतील तर मोक्ष मिळेल, असे थोडेफार काही कानावर आले आहे का?
सत्धर्म म्हणजे भगवंतांनी सांगितलेले शास्त्र-आगम, तो आहे सत्धर्म. सत्धर्म तर आहे, भगवंतांनी सांगितलेली शास्त्रे आहेत पण गुरूशिवाय ती समजावणार कोण? आणि सद्गुरू तर आपल्या येथे असतात पण ते सुद्धा आता सद्गुरू राहिले नाहीत. कारण त्यांना आत्मज्ञान नाही म्हणून! म्हणजे सद्गुरू तर पाहिजेच. ते जेव्हा तुमच्या घरी (आहार) घ्यायला येतात तेव्हा तुम्ही त्यांना आहार द्यावे. आणि त्याच्या बदल्यात तुम्ही त्यांच्याकडे शिकायला जायचे, अशी व्यवस्था भगवंतानी केलेली आहे. प्रत्येक व्यक्तीला, ऐंशी वर्षाच्या मनुष्याला सुद्धा सद्गुरूची गरज असते. आणि सत्देव म्हणजे काय? तर वीतराग भगवंत. आता ते जर प्रत्यक्ष हजर नसतील तर त्यांची मूर्ती ठेवतात. परंतु सद्गुरू तर प्रत्यक्षात हजर हवेच. त्यांची मूर्ती ठेवून चालणार नाही.