________________
१३२
गुरु-शिष्य
त्यात बिचाऱ्या ग्राहकांचाच सगळा दोष नाही. या दलालांचा दोष आहे. या दलालांचे पोट भरतच नाही आणि लोकांचेही भरू देत नाहीत. म्हणून मी हे उघड करू इच्छितो. हे तर दलालीतच ऐषआराम आणि मौज करतात आणि आपापली सेफसाईडच शोधली आहे. परंतु त्यांना असे सांगू नये की, त्यांचा दोष आहे. सांगून काय फायदा ? समोरच्याला दुःख वाटेल. आपण दुःख देण्यासाठी आलो नाहीत. आपल्याला तर हेच समजण्याची गरज आहे की त्रूटी कुठे आहे ! आता दलाल का थांबलेत ? कारण गिऱ्हाईक पुष्कळ आहेत म्हणून. गिहाईकच नसतील तर दलाल काय करतील ? निघून जातील. पण मुळात या गिऱ्हाईकांचाच दोष आहे ना ? म्हणजे मूळ दोष तर आपलाच आहे ! दलाल कुठपर्यंत थांबतात ? गिऱ्हाइक असतील तोपर्यंत. घरांचे दलाल कुठपर्यंत धावपळ करतील ? घरांचे ग्राहक असतील तोपर्यंत. नाही तर बंद, चूप!
लालूचच भ्रमित करते
प्रश्नकर्ता : हल्ली तर गुरू पैशांच्याच मागे लागलेले असतात.
दादाश्री : हे लोक सुद्धा असेच आहेत ना ? लाकूड वाकडे आहे म्हणून ही करवत सुद्धा वाकडी आहे. लाकूडच सरळ नाही ना ! लोक वाकडे चालतात म्हणून गुरू देखील वाकडे भेटतात. लोकांमध्ये कोणता वाकडेपणा आहे? ‘माझ्या मुलाच्या घरी मुलगा व्हावा.' म्हणजे लोक लालची आहेत म्हणून हे लोक डोक्यावर चढून बसलेत. अरे, तो काय मुलाकडे मुलगा देणार होता? तो कुठून आणणार ? तो स्वतःच बायकोमुलांशिवायचा आहे, मग तो कुठून आणणार ? ज्याला मुले असतील त्याला सांग ना ! हे तर 'माझ्या मुलाच्या घरी मुलगा व्हावा, ' म्हणून त्याला गुरू बनवतात. म्हणजे लोक लालची आहेत तोपर्यंत हे धूर्त चढून बसलेत. लालची आहेत, म्हणून गुरूच्या मागे लागतात. आपल्याला लोभ-लालूच नसेल आणि मग गुरू बनवले तरच खरे !
हे तर कपडे बदलून लोकांना फसवतात आणि लोक लालची आहेत म्हणून फसतात. लालची नसतील तर कोणीच फसणार नाही! ज्याला कुठल्याही प्रकारचा लोभ-लालूच नाही, त्याची फसवणूक होण्याची वेळच येत नाही.