________________
९६
गुरु-शिष्य
दादाश्री : आपली श्रद्धा फळेल, पण जर गुरूंवर अभाव झाला नाही तर फळेल. गुरूंनी कदाचित काही उलट-सुलट केले तरी देखील त्यांच्याविषयी भाव बिघडला नाही, अभाव झाला नाही, तर तुमची श्रद्धा फळेल.
प्रश्नकर्ता : अर्थात जर आपला भाव असेल, तर आम्ही गुरुंच्याही पुढे प्रगती करू शकतो ना ?
दादाश्री : प्रगती करु शकता, नक्कीच प्रगती करु शकता! पण जर तुम्ही तुमचा भाव बिघडवला नाही तर. गुरूंच्या आत भगवंत बसले आहेत, जिवंत भगवंत ! त्या भीमाने लोटा ठेवला होता, तरी सुद्धा त्याचे काम झाले. अर्थात तुमची श्रद्धाच काम करते ना ! एखाद्याने गुरू केले असतील आणि ते गुरू जर कधी वेडेवाकडे बोलले आणि जर त्या व्यक्तीस चुका काढण्याची सवय असेल ना, तर तो मागे पडेल. जर तुमच्यात गुरूंना सांभाळण्याची शक्ती असेल, तर गुरूने कितीही उलटसुलटे केले किंवा मग गुरूंना सन्निपात झाला तरी सुद्धा त्यांना सांभाळता आले तर कामच झाले म्हणा. परंतु शेवटपर्यंत निभावून नेत नाही ना! निभावून नेणे जमतच नाही ना !
प्रश्नकर्ता : एखाद्या अयोग्य पुरुषात सुद्धा जर पूर्ण श्रध्देने स्थापना केली तर ती फळ देते की नाही ?
दादाश्री : का नाही देणार ? परंतु त्यांना स्थापन केल्यानंतर आपली श्रद्धा पलटायला नको.
हे सगळे काय आहे ? तुम्हाला वास्तविकता सांगू का ? तुम्हाला अगदी स्पष्ट सांगू का ? गुरू तर फळ देत नाहीत. तुमची श्रद्धाच तुम्हाला फळ देते. गुरू कसेही असो, पण आपली दृष्टी फळ देते. ही मूर्ती सुद्धा फळ देत नाही, तुमची श्रद्धाच फळ देते आणि जितकी तुमची श्रद्धा स्ट्रोंग असेल, तसेच सत्वर फळ मिळते !
असे आहे की, या जगात श्रद्धा बसते आणि उडून जाते. फक्त ज्ञानीपुरुषच असे आहेत की जे श्रध्देचीच मूर्ती, सगळ्यांचीच श्रद्धा बसते.