________________
गुरु-शिष्य
प्रश्नकर्ता : बहुतेक लोकांकडे गेलो तर ते प्रथम काय सांगतात की तुम्ही श्रद्धा ठेवा.
दादाश्री : परंतु मी श्रद्धा ठेवण्यास मनाई करतो. तुम्ही माझ्यावर बिलकूल श्रद्धा ठेऊच नका. श्रद्धा कुठल्याही जागी ठेवायची नसते. श्रद्धा फक्त बसमध्ये बसताना ठेवा, गाडीत बसताना ठेवा. पण या मनुष्यांवर जास्त श्रद्धा ठेऊ नका. श्रद्धा आपल्यात उत्पन्न व्हायला हवी.
प्रश्नकर्ता : असे का?
दादाश्री : मागे गोंद लावलेला असेल तरच तिकीट चिकटेल ना? गोंदाशिवाय चिकटेल का? मी जेव्हा पंचवीस वर्षांचा होतो तेव्हा एका बापजीकडे गेलो होतो. ते मला म्हणू लागले, 'भाऊ, श्रद्धा ठेवाल तरच तुम्हाला हे सर्व समजेल. तुम्ही माझ्यावर श्रद्धा ठेवा!' 'कुठवर ठेवू?' तर म्हणाले 'सहा महिने.' मी म्हटले, 'साहेब, आत्ताच श्रद्धा बसत नाही ना! असा कोणता तरी गोंद लावा की ज्यामुळे माझे तिकीट चिकटेल, हे तर मी चिटकवत आहे, श्रद्धा चिटकवत आहे पण चिकटत नाही, चिकटवत आहे पण चिकटतच नाही. श्रद्धा बसतच नाही. तुम्ही असे काही बोला की माझी श्रद्धा बसेल.' तुम्ही काय म्हणता? श्रद्धा बसली पाहिजे की ठेवली पाहिजे?
प्रश्नकर्ता : बसली पाहिजे.
दादाश्री : हो. यायला हवी. 'तुम्ही काही तरी बोला' असे जेव्हा मी म्हटले, तेव्हा ते म्हणाले 'असे कसे? श्रद्धा तर ठेवावी लागते. हे सगळे लोक श्रद्धा ठेवतातच ना?' मी म्हटले, 'मला तसे जमणार नाही.' नुसती थुकी लावून चिकटवलेली श्रद्धा किती दिवस टिकेल? त्यासाठी तर गोंद पाहिजे, त्याने पटकन चिकटेल. मग कधी निघणारच नाही ना! कागद फाटेल पण ती निघणार नाही. आणि जर त्यांनी असे म्हटले की, 'तुमचा गोंद कमी आहे' तर आपण सांगावे की, 'नाही.' गोंद तुम्ही लावायचा, तिकीट माझे. तुम्ही तर गोंद लावतच नाहीत. आणि पाकिटाला तिकीट चिकटवतो ना, तर छाप मारण्याआधीच तिकीट खाली पडते आणि मग तिथे दंड भरावा लागतो. तुम्ही तिकिटाच्या मागे काही तरी लावा.