________________
गुरु-शिष्य
असे पारखले जाते खरे नाणे प्रश्नकर्ता : खरे गुरू आहेत, हे जाणण्यासाठी काही पक्की खूण आहे का?
दादाश्री : ओळखीसाठी तर, आपण शिव्या दिल्या, तर क्षमा करत नाहीत पण सहज क्षमा होऊन जाते. आपण मारले तरी सुद्धा क्षमा असते. हवा तसा अपमान केला तरी सुद्धा क्षमाच असते. मग ते सरळ असतात. त्यांना आमच्याजवळ काही लालूच नसते. आमच्यापाशी पैशासंबंधी मागणी करत नाही. आणि आम्ही काही प्रश्न विचारले, तर त्या प्रश्नाचे समाधान करतात आणि जर त्यांना छेडले, सतावले तरी सुद्धा ते फणा काढत नाहीत. कदाचित काही चूक झाली असेल तरीही फणा काढत नाही. फणा काढतात त्यांना काय म्हणतात? फणाधारी नाग म्हणतात. ही सगळी त्यांची ओळख सांगितली.
नाही तर मग गुरूची पारख केली पाहिजे आणि नंतर गुरू बनवले पाहिजेत. वाटेल त्याला गुरू करून बसतो त्याला काही अर्थ नाही!
प्रश्नकर्ता : कोण कसा आहे ते कसे कळू शकेल?
दादाश्री : पूर्वीच्या काळातीत एडवर्ड रुपये आणि राणी छापाचे रुपये तुम्ही पाहिले होते का? आता तो रुपया असेल तरीही लोक विश्वास ठेवत नव्हते. अरे, हे रुपये आहेत, व्यवहारात त्याचे चलनही आहे ना? परंतु नाही, तरी सुद्धा त्याला दगड किंवा लोखंडावर आपटत होते! अरे, लक्ष्मीला आपटू नकोस, पण तरीही आपटत होते. का आपटत असतील? रुपया खणखणला त्यामुळे तो कलदार आहे की खोटा आहे हे नक्कीच कळेल की नाही? असे खणखणला की खननन... बोलला तर आम्ही त्यास तिजोरीत ठेवतो आणि जर खोटा निघाला तर कापून टाकतो किंवा फेकून देतो. अर्थात अशी टेस्ट करून पाहा, रुपया खणखणून पाहावे. तसेच नेहमी गुरूचीही टेस्ट करा.
प्रश्नकर्ता : परीक्षा करायची?!
दादाश्री : टेस्ट! परीक्षा करता येणार नाही. बालक असेल तो प्रोफेसरची परीक्षा कशी घेईल?