________________
गुरु-शिष्य
नाही तर घड्यास गुरू बनवा प्रश्नकर्ता : परंतु जेव्हा गुरू केले असतील, तेव्हा त्यांना इतकी समज नसते.
दादाश्री : आणि जणू हे समजुतीचे पोते(!) झालेत, म्हणून आता गुरूला नाठाळ म्हणावे? त्यापेक्षा भीम होता ना, त्या भीमाची पद्धत वापरा. त्या दुसऱ्या चार भावांची पद्धत वापरायची आपल्याला गरज नाही. कारण कोणत्याही गुरूंना नमस्कार करावा लागला तर भीमाला हुडहुडी भरत असे, अपमानास्पद वाटत असे. म्हणून भीमाने काय विचार केला? की हे गुरू मला परवडत नाहीत. माझे भाऊ बसतात, त्यांना काही सुद्धा होत नाही आणि मला तर, गुरूंना पाहिल्याबरोबर माझा अहंकार उसळू लागतो, मला उलट-सुलट विचार येतात. पण तरी गुरू तर केलेच पाहिजेत. गुरुंशिवाय माझी काय अवस्था होईल? त्याने उपाय शोधून काढला.
एक मातीचा घडा होता, त्याला जमिनीमध्ये उलटा गाडला आणि त्यावर काळा रंग दिला आणि त्यावर लाल अक्षरात लिहिले, 'नमो नेमीनाथायः' नेमीनाथ भगवंत श्याम होते-काळे होते म्हणून काळा रंग दिला! आणि मग त्याची भक्ती केली. हो, तो घडा गुरू आणि स्वतः शिष्य!
गुरू येथे प्रत्यक्ष डोळ्यांनी दिसत नव्हते आणि त्या प्रत्यक्ष गुरूंसमोर त्याला लाज वाटत होती, त्यांना नमस्कार करत नव्हता, आणि येथे घडा उलटा गाडून दर्शन केले, म्हणून भक्ती सुरु झाली, तरी सुद्धा फळ मिळत होते. कारण विष होत नव्हते. म्हणजे येथेही जर उल्हास वाटला तरी तुमचे कल्याण होईल!
सकाळ झाली, संध्याकाळ झाली की भीम तिथे जाऊन बसत असे. म्हणजे असे गुरू चांगले की आपल्याला कधी राग तर येणार नाही, काही झझंट तर नाही. राग आला तर घडा उकरुन काढावा. आणि त्या जिवंत माणसांवर श्रद्धा, ती तर मारूनच टाकते. कारण आत भगवंत बसलेले आहेत. त्या घड्यावर तर फक्त भगवंताचा आरोपणच आहे, आपणच भगवंताचे आरोपण केले आहे.