________________
गुरु-शिष्य
निभावून घ्या. तुमच्यात पुष्कळ चुका आहेत आणि त्यांच्यात तर एक-दोन चुका असतील, मग तिथे तुम्ही न्यायाधीश कशाला बनता? तुमच्यापेक्षा मोठे आहेत म्हणून ते तुम्हाला नक्कीच पुढे घेऊन जातील. न्यायाधीश बनणे हा भयंकर मोठा अपराध आहे.
जोपर्यंत सम्यक् दर्शन होत नाही, तोपर्यंत स्वछंद जात नाही. किंवा मग एखाद्या गुरूच्या अधीन राहून वागत असेल तर त्याची सुटका होईल, पण संपूर्ण अधीन, पूर्णपणे अधीन राहून वागणे असेल तेव्हाच! गुरूच्या अधीन राहत असेल त्याची तर गोष्टच वेगळी आहे. जरी गुरू मिथ्यात्वी असतील तरी हरकत नाही पण शिष्य गुरूच्या अधीन, पूर्णपणे अधीन राहिला तर त्याचा स्वछंदपणा निघून जाईल. कृपाळुदेवांनी तर अगदी सत्य लिहिले आहे, पण आता ते सुद्धा समजणे कठीण आहे ना! जोपर्यंत स्वछंद जात नाही, तोपर्यंत कसे काय समजेल? स्वछंद जाणे ही सहजसाध्य गोष्ट आहे का?
__ प्रश्नकर्ता : जोपर्यंत ज्ञानी भेटत नाहीत, तोपर्यंत स्वछंद जाणारच नाही ना!
दादाश्री : नाही, जरी वेडाखुळा गुरू माथी ठेवला असेल आणि शिष्य आयुष्यभर शिष्यतेचा विनय राखून वागत असेल तर त्याचा स्वछंद गेला असे म्हणता येईल. गुरूच्या विरुद्ध जाऊन या लोकांनी त्यांना शिव्या दिल्या आहेत. मनुष्यात असे सार्मथ्य नाही की तो विनय न चुकता राहील. कारण थोडे जरी उलटसुलट दिसले की बुद्धी वेडेपणा करतेच!
माथी ज्ञानी मिळाले नाही तर गुरू तरी पाहिजेतच. नाही तर मनुष्य स्वछंदपणेच वागत राहील. या पतंगाची दोरी सोडून दिली तर पतंगाची काय दशा होईल?
प्रश्नकर्ता : गटांगळ्या खातच राहील.
दादाश्री : हो, हे पतंगाची दोरी सोडल्यासारखे आहे. जोपर्यंत आत्मा हाती लागत नाही तोपर्यंत पतंगाची दोरी सुटलेली आहे. तुमच्या लक्षात आले ना हे?