________________
गुरु-शिष्य
३७
दादाश्री : हो, आसक्ती नसलेले हवेत. आसक्तीवाले असतील, धनाची आसक्ती असेल किंवा दुसरी कोणतीही आसक्ती असेल तर काय कामाचे? आपल्याला जो रोग आहे तोच रोग त्यांना सुद्धा आहे, दोघेही रोगी. मग त्यासाठी हॉस्पिटलमध्ये जावे लागते! यांना मेंटल हॉस्पिटलचे रोगी म्हणतात. कोणत्याही प्रकारची आसक्ती नसलेले गुरू केले तर ते कामाचे.
रोज भजी खात असतील किंवा लाडू खात असतील तरी सुद्धा हरकत नाही, फक्त आसक्ती आहे की नाही एवढेच पाहावे लागेल. अरे, कोणी फक्त दूध पिऊन जगत असतील पण आसक्ती आहे किंवा नाही एवढेच पाहावे लागेल. हे तर या गुरूंनी तऱ्हेतऱ्हेचे नखरे दाखवले आहेत. ‘आम्ही हे खात नाही, आम्ही ते खात नाही!' अरे, सोड ना ही झंझट. जे असेल ते खा ना ! खाण्यास मिळत नाही की खात नाही ! हे तर लोकांसमोर नखरे दाखवायचे असतात. हा एक प्रकारचा बोर्ड (पाटी) आहे की, 'आम्ही हे खात नाही, आम्ही हे करत नाही. ' लोकांना स्वतःकडे आकर्षित करण्यासाठी असे बोर्ड लावलेले आहेत. मी असे बरेच बोर्ड हिंदुस्तानात पाहिले आहेत. अर्थात आसक्तीरहित गुरू असावे. मग तो खात असेल किंवा नसेल, ते पाहण्याची आपल्याला गरजच नाही.
ज्यांच्यात किंचितमात्र आसक्ती असेल, असे गुरू करुन काही काम होणार नाही. असे आसक्तीवाले गुरू भेटल्यामुळेच तर सारी दुनिया ठेचा खात राहिली आहे. ज्याला आसक्तीचा रोग नसतो, त्यांना गुरू म्हणतात. किंचितमात्र आसक्ती असू नये.
किती कमीपणा चालवून घेतला जाईल ?
प्रश्नकर्ता : गुरूची गती गहन असते, म्हणून त्यांचा पूर्वपरिचय झाल्यानंतरच समजते. बाह्य दिखाव्याने काहीच समजत नाही.
दादाश्री : त्यांच्यासोबत दहा-पंधरा दिवस राहिलात, तर चंचलतेचा ठाव लागेल. आणि जोपर्यंत ते चंचल आहेत ना, तोपर्यंत आपले काही काम होत नाही. ते अचल झालेले हवेत.