________________
गुरु-शिष्य
निमित्तच महा उपकारी प्रश्नकर्ता : हो, उपादान तयार असेल तर निमित्त आपोआपच मिळते, ही गोष्ट प्रचलित आहे.
दादाश्री : उपादान तर आपल्या येथे पुष्कळ लोकांचे फार उच्च कोटीचे आहे परंतु त्यांना निमित्त मिळाले नाही म्हणून ते भटकत राहिले. तेव्हा हे वाक्यच चुकीचे आहे की, 'उपादान तयार असेल तर निमित्त
आपोआप मिळते.' हे वाक्य बोलण्यात भयंकर जोखीम आहे, 'ज्ञानाची विराधना करायची असेल तरच असे वाक्य बोलावे!
प्रश्नकर्ता : निमित्त आणि उपादान याविषयी आणखी सविस्तर समजवा. उपादान तयार असेल तर निमित्त आपोआप मिळते. आणि जर निमित्त मिळत राहतील परंतु उपादान तयार नसेल, मग अशा परिस्थितीत निमित्त काय करेल?
दादाश्री : या ज्या लिहिलेल्या गोष्टी आहेत ना, त्या सर्व करेक्ट (बरोबर) नाहीत. करेक्ट असेल तर एकच वस्तू करेक्ट आहे की निमित्ताचीही गरज आहे आणि उपादानाचीही गरज आहे. परंतु उपादान जरी कमी असेल पण जर त्याला निमित्त मिळाले तर त्याचे उपादान वाढते.
निमित्तच उपकारी आहे. या शाळा बंद केल्या तर? असे मानले की 'मुले हुशार असतील, उपादान तयार असेल, तेव्हा निमित्त येऊन मिळेल' असे समजून शाळा वगैरे बंद केल्या तर चालेल?
प्रश्नकर्ता : तसे तर चालणार नाही. पण ही तर व्यवहाराची गोष्ट झाली.
दादाश्री : नाही, व्यवहारात सुद्धा तीच गोष्ट आणि यात सुद्धा तीच गोष्ट ! यात सुद्धा निमित्ताची मुख्य गरज आहे.
जर शाळा बंद केल्या, पुस्तके काढून टाकली, तर कोणताही मनुष्य काही शिकणार नाही, लिहिणार नाही. निमित्त असेल तर आपले काम होईल, नाही तर काम होणार नाही. तर निमित्तामध्ये काय काय आहे ?