________________
गुरु-शिष्य
प्रश्नकर्ता : नंतर कसली गरज?
दादाश्री : या गाडीला ब्रेक होता म्हणून टक्कर झाली नाही, तर काय हा ब्रेक काढून टाकायचा?
प्रश्नकर्ता : गुरुंनी मार्ग तर दाखवला, मग त्यांना धरुन ठेवण्याची काय गरज?
दादाश्री : रस्त्यात शेवटपर्यंत गुरूची गरज पडेल. गुरूस त्यांच्या गुरूंची गरज पडेल. शाळेत आपल्याला शिक्षकांची गरज केव्हा असते? आपल्याला शिकायचे असेल तरच ना? आणि शिकायचेच नसेल तर? म्हणजेच आपल्याला दुसरा कोणताच लाभ नको असेल तर गुरू नेमण्याची आवश्यकता नाही. जर लाभ हवा असेल तर गुरू करावेत. म्हणजे हे काही अनिवार्य नाही. हे सगळे तुमच्या इच्छेवर अवलंबून आहे. तुम्हाला शिकायचे असेल तर शिक्षक ठेवा. तुम्हाला अध्यात्म जाणून घ्यायचे असेल तर गुरू करावेत आणि जाणायचेच नसेल मग काही गरज नाही. असा काही नियम नाही की तुम्ही असेच करा. इथून जर स्टेशनवर जायचे असेल तरी गुरू लागतो, तर मग धर्मासाठी गुरू नको का? तात्पर्य गुरू आपल्याला प्रत्येक श्रेणीत लागतातच.
गुरूशिवाय 'ज्ञान' नाही कुठलेही ज्ञान गुरूशिवाय प्राप्त होणे शक्यच नाही. सांसारिक ज्ञान सुद्धा गुरूशिवाय प्राप्त होत नाही आणि आध्यात्मिक ज्ञान सुद्धा गुरूशिवाय प्राप्त होईल असे नाही. गुरूशिवाय ज्ञानाची आशा बाळगणे ही साफ चुकीची गोष्ट आहे.
प्रश्नकर्ता : एक व्यक्ती म्हणते की 'ज्ञान घ्यायचेही नसते, आणि ज्ञान द्यायचेही नसते, ज्ञान होऊन जाते.' तर ते आम्हाला समजवा.
दादाश्री : हा मूर्च्छित लोकांचा शोध आहे. मूर्च्छित लोक असतात ना, त्यांचा हा शोध आहे की, 'ज्ञान घ्यायचे नसते, द्यायचे नसते, ज्ञान आपोआप होत असते.' पण त्यांची ही मूर्छा कधीही जात नाही. कारण लहानपणापासून तो जे काही शिकला ते सुद्धा ज्ञान घेत घेतच आला आहे,