________________
क्लेश रहित जीवन
तुम्हाला मोक्षाला जाण्याची इच्छा असेल तर जा, आणि नसेल तर नका जाऊ, पण इथे तुम्ही केलेले सर्व गुंते सोडवून जा. इथे तर प्रत्येक प्रकारचे खुलासे होतात. वकील तर फक्त व्यवहारिक अडचणींवरील सल्ले देतात तरी देखील फी आकारतात! पण हा तर अमूल्य खुलासा, याचे मोलच होऊ शकत नाही ना! जीवनात खूप गुंतागुंत आहे. फक्त तुम्हालाच आहे असे नाही, सगळ्यांनाच आहे. 'द वर्ल्ड इज द पजल इट सेल्फ' हे 'जग' स्वतःच एक कोडे झाले आहे.
__धर्म तर नंतर करायचा आहे, परंतु तत्पूर्वी जीवन जगण्याची कला समजून घ्या आणि लग्न करण्याआधी बाप होण्यासाठी योग्यतापत्र मिळवा. एक इंजिन आणले, त्यात पेट्रोल टाकले आणि सतत चालवत राहिलो पण हे असे मिनिंगलेस जीवन काय कामाचे? जीवन तर हेतूसहित असले पाहिजे. हे तर इंजिन चालतच राहते, चालतच राहते, असे निरर्थक चालता कामा नये. इंजिनला पट्टा जोडला तर काही दळले तरी जाईल. पण इथे तर पूर्ण आयुष्य संपत येते तरीही काही दळले जात नाही. आणि वरून पुढील जन्माचे गुन्हे (कर्म) बांधून घेतात.
संपूर्ण आयुष्यच फॅक्चर झाले आहे. कशासाठी जगत आहोत याचे भानच उरलेले नाही की मी मनुष्यसार काढण्यासाठी जगत आहे! मनुष्यसार म्हणजे काय? तर म्हणे, पुढील जन्मी ज्या गतीत जायचे असेल ती गती मिळवणे किंवा मोक्षाला जायचे असेल तर मोक्षाला जाता येणे! या अशा मनुष्यसाराचे कोणाला भानच नाही, म्हणून तर निरर्थक भटकत राहतात.
पण ती कला कोण शिकवणार?! आज जगाला हिताहीतचे भानच नाही, कित्येकांना संसारातील हिताहितचे भान असते, कारण कित्येकांनी ते बुद्धीच्या आधारावर ठरवलेले असते पण ते सांसारिक भान म्हटले जाते की मी संसारात कशाप्रकारे सुखी होऊ शकेल? खरे पाहिले तर हे सुद्धा 'करेक्ट' नाही.