________________
शरीराबरोबर आत्म्याचे विघटन झाले, नित्य असे काहीच नाही उरले, शरीर आणि आत्मा वेगवेगळे आहे, हे न समजल्यामुळे तज्जीवतच्छरीरवादी बनले.
आत्म्याचे अस्तित्व स्वीकारले, पण आत्म्याचे कर्तृत्व-भोक्तृत्व नाकारले, अज्ञानाच्या वाटेने निघाले अन्, असत्याच्या अंधारात फसले, काय करावे, काय करू नये, हे न सुचल्यामुळे सारे ईश्वरीसत्तेवर सोडले, कर्मबंधाच्या भयाने क्रियांचेच निषेध केले, ते अकारक-अक्रियावादी ठरले.
रूप, वेदना, विज्ञान, संज्ञा, संस्काराला
क्षणमात्र स्थिर रहाणारे स्कंध मानले, पृथ्वी, पाणी, तेज, वायु आदि धातूंनी, शरीरात परिणत होणाऱ्याला जीव समजले, दुःखातून मुक्त करणाऱ्या यतिधर्माला कधी न जाणले, जन्म-मरणाच्या चक्रात फिरतच राहिले, आत्म्याची सत्ता नाहीच असे मानणारे, अफलवादी, धातुवादी, क्षणिकवादी ठरले. पाच महाभूतांबरोबर सहावा आत्मा आणि लोक मानले, ईश्वरी सत्ता नाही, सुख-दुःख न स्वयंकृत, न अन्यकृत, जे घडले ते सारे नियतीनेच घडले, जे असत् ते कधीच उत्पन्न न झाले, जे सत् आहे तेच नित्य राहिले,