________________
त्याअर्थी मनात प्रश्न निर्माण होतो की त्याकाळी सुद्धा अशा प्रकारच्या विद्या सामाजिक वातावरणात अस्तित्वात होत्या का ? प्रत्यक्षात त्याचा वापर होत होता का ? तर उत्तर होकाराकडेच जाते. फक्त जैनच नव्हेत तर बौद्ध व वैदिक अशा तिन्ही परंपरेतील अनेक ग्रंथात वेगवेगळ्या विद्यांचे वर्णन आढळते. अथर्ववेदात मंत्र, तंत्र वशीकरण, जादूटोणा, अंधश्रद्धा यांचा प्रभाव असलेल्या समाजाचे चित्रण आढळते. म्हणूनच आरंभी वैदिकांनी तीन वेदांनाच पवित्र मानले. अथर्ववेदाला ‘लोकवेद' असे संबोधले. बौद्ध परंपरेचे कालपरत्वे जे चार संप्रदाय झाले त्यापैकी एक संप्रदाय तंत्र व मंत्रांच्या उपासनेवरच आधारित होता.
जैन साधुआचारविषयक ग्रंथात आदर्श तर असा आहे की, अशा विद्यांचा उपजीविकेसाठी या अन्य कोणत्याही कारणासाठी वापर करू नये. जर केला तर परिणामस्वरूप परलोकात अहित होईल. मृत्युनंतर असुरसंबंधी किल्विष देव व्हाल. त्यानंतर पुढील जन्मात आंधळे, मुके व्हाल. एकंदरीतच या विद्या पापश्रुत आहेत व त्या तुम्हाला पापी योनीमध्ये ढकलणाऱ्या विद्या आहेत.
पातंजलयोगसूत्रातील ‘विभूतिपादा'त सिद्धींचे वर्णन करताना तेथे स्पष्टतः म्हटले आहे की - ते समाधावुपसर्गा व्युत्थाने सिद्धयः । (पा.योग ३.३७) याचाच अर्थ असा की अशा सिद्धी, समाधी प्राप्त करण्यात अथवा ज्ञान प्राप्त करण्यात विघ्ने आहेत, अडथळा आहेत. योगसूत्रातील वर्णिलेल्या या सिद्धी या अघोरी नसून कल्याणकारक आहेत तरीही त्या तुमच्या उन्नत्तीत बाधा आणणार असल्यामुळे त्यांच्या निषेधाचाच सूर आहे.
म्हणजेच या विद्या तुमच्या आध्यात्मिक प्रगतीत अडथळा आहेत अथवा त्यामुळे तुमचे अध:पतन होणार आहे असे स्पष्ट उल्लेख असतानाही वास्तव काही वेगळेच आहे.
१६२