________________
(५) सूत्रकृतांगातील प्रत्याख्यानाचे स्वरूप
व्याख्यान : डॉ. नलिनी जोशी
शब्दांकन : डॉ. अनीता बोथरा
वैभवलक्ष्मीव्रत, संकष्टीव्रत, मंगळवार, शुक्रवार इ. अनेक व्रते जैनेतर समाजात चालू असतात व त्याचे पडसाद जैन समाजावरही पडत असतात. समाजात एकमेकांचा एकमेकांवर प्रभाव पडत असतो, हे जरी सत्य असले तरी, वास्तविकता अशी आहे की जैनेतर समाजाकडून जैन समाजाची आदानाची अर्थात् ग्रहणाची क्रिया जितक्या प्रमाणात आहे, तितक्या प्रमाणात जैनांकडून घेण्याची जैनेतरांची प्रतिक्रिया मात्र दिसून येत नाही. जैन समाजात जैनेतरव्रते करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस तर वाढत चालले आहे पण त्याचबरोबर उपवास, प्रत्याख्यान, नियम इ. जैनव्रते करण्याची परंपराही चालू आहे. महत्त्वाचा प्रश्न असा आहे की, कोणतेही छोटे-मोठे व्रत - नियम - प्रत्याख्यान असो, ते आपण का करतो ?, कशासाठी करतो ? व कसे करतो ? याचे ज्ञान असणे महत्त्वाचे आहे.
'संपूर्ण कर्मबंधापासून मुक्तता', हे जैनधर्माचे मुख्य ध्येय आहे. म्हणूनच भूतकाळातील कर्मबंधापासून मुक्त होण्यासाठी 'प्रतिक्रमण' व भविष्यकाळात कर्मबंध होऊ नये म्हणून 'प्रत्याख्यान' हे दोन उपाय जैनधर्मात वारंवार निर्दिष्ट केले जातात. प्रत्याख्यानाचा हा रामबाण उपाय जैनधर्माशिवाय विश्वातील कोणत्याही धर्माने सांगितलेला नाही.
बौद्धधर्मात आत्मा ‘अनादि व नित्य' मानतच नाहीत. आत्मा हा संस्कारमय व क्षणिक असा मानतात. सांख्य दर्शनाने 'प्रकृति' म्हणजे जड व 'पुरुष' म्हणजे चेतन अशी दोन तत्त्वे तर मानली आहेत परंतु पुरुष हा तटस्थ व साक्षी असून
१८१