________________
वर उल्लेखिलेला अनेकान्तवाद कोणी व कसा आचरणात आणायचा हा आजच्या काळातील मोठा यक्षप्रश्न आहे. दोन व्यक्ती अथवा दोन पक्ष समोरासमोर आल्यावर, वैचारिक उदारता प्रथम कोणी दाखवायची व कोण कोणाचे ऐकून घेणार आहे हा प्रश्नच आहे. उलटपक्षी जो कोणी प्रथम नमते घेईल, त्याला भित्रा, बुळा असेही संबोधले जाईल. त्यामुळे अनेकान्तवाद सामान्य व्यक्तीच्या आटोक्याबाहेरचा आहे असे वाटते. याउलट ज्यांच्यामध्ये तात्त्विक विचारांची बैठक आहे, आत्मौपम्य बुद्धी आहे व सहनशीलता आहे, अशी विवेकी मंडळीच त्याचे आचरण करू शकतील, त्याचा विचार करू शकतील असेही वाटू लागते.
वाणीसंयमाचे महत्त्व तर महावीरांनी अनेक उपदेशातून पटवून दिले आहे. जिभेवर ताबा असेल तरच साधूचे अस्तित्व टिकून राहते. त्याची जनमानसातील प्रतिमा उंचावते. नाहीतर ती रसातळाला जावयास वेळ लागत नाही. त्याचबरोबर वाणीचा संबंध हिंसेशी असल्याने पापमय प्रवृत्तींना उत्तेजन देणाऱ्या भाषेचा वापर टाळावा लागतो. तसेच निश्चयात्मक, हेकेखोर, आक्रमक, एकांगी बोलणे टाळावे लागते. हे जरी सगळे खरे असले तरी समाजातील वाईट प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी, साधूंना, वेळप्रसंगी प्रवचनातून दोन खडे बोलही सुनवावे लागतात, नव्हे ते त्यांचे कर्तव्य ठरते, हे आपण पाहतो.
सर्वसामान्यांच्या बाबतीतही वाणीसंयमाचे महत्त्व पदोपदी जाणवते. वर्तमानपत्रातून येणारी उच्चपदस्थांची बेजबाबदार वक्तव्ये देशाची प्रतिमा मलिन करताना दिसतात. तसेच अनेक तथाकथित लोकमान्य संतांचे अशोभनीय आचरण शरमेने मान खाली घालावयास लावते.
थोडक्यात, साधूंची समाजाकडे पाहण्याची दृष्टी कशी असावी, त्यांचा वाणीसंयम कसा महत्त्वाचा आहे, त्याचबरोबर त्यांची विधाने द्रव्य, क्षेत्र, काल,
१९७