________________
अंगीकार केला. गौतमाने विनयपूर्वक महावीरांकडून त्याला पंचमहाव्रतात्मक धर्म देऊन, श्रमणसंघात सम्मीलित केले. यावरून उदकपेढालपुत्राची सत्य जाणण्याची व पचविण्याची वृत्ती तर गौतम हे 'विद्या विनयेन शोभते' चे प्रतीक.
उपसंहार : वरील व्यक्तिरेखांमुळे सूत्रकृतांगातील मुख्य विषयाला पुष्टी मिळते. जसे एखाद्या चित्रपटात जर खलनायक नसेल तर नायकाचे कर्तृत्व दिसून येत नाही, त्याप्रमाणे गोशालकासारखा कृतघ्न शिष्य नसता तर महावीरांची आध्यात्मिक उंची दिसली नसती. त्यांच्या विचारांचे मंथन करविण्यास व पंचमहाव्रतांचे नवनीत काढण्यात गोशालकाच्या आरोपांचा खूप मोठा वाटा आहे. एवढे असूनही गोशालकाच्या 'नियतिवादा'ला षड्दर्शनात स्थान मिळाले नाही हेही आश्चर्यच !
स्वत:चे मत स्वच्छ व स्पष्ट असेल तर विरोधीही आपलासा करता येतो, हे गौतम-पेढालपुत्राच्या संवादावरून स्पष्ट होते जे आजच्या राजकारण्यास उपयोगी आहे. अनेक मतप्रवाह असले तरी वादविवाद न करता सुसंवाद साधता येतो, यावरही येथे प्रकाश पडतो. समन्वयवृत्ती, कृतज्ञता, परस्परांमधील आदर इ. गुणांची जोपासनाही दिसून येते. गौतम - महावीर म्हणजे 'ग्रंथ' अध्ययनातील गुरु-शिष्य नात्याचा आदर्श परिपाक होय, जे आजच्या शिक्षण व्यवस्थेसाठी अतिशय मार्गदर्शक आहे.
थोड्या फार त्रुटी वगळता ‘स्वसमय-परसमय' या केंद्रस्थानी असलेल्या विषयाला, वरील व्यक्तिरेखांमुळे रोचकता आली आहे. पक्षांतर, धर्मांतर करणाऱ्यांसाठी हा जणू आदर्श वस्तुपाठच आहे.
२२२