________________
बाह्य व्यक्तिमत्व सुधारण्यास मदत होईल परंतु भ. महावीरांनी अठरा पापस्थानांच्या त्यागरूपाने आंतरिक व्यक्तिमत्व सुधारण्याची गुरुकिल्ली दिली आहे.
प्रत्येक संसारी आत्मा हा असत् अनुष्ठानात मग्न, चुकीच्या धारणांनी युक्त, पक्षपाती, अज्ञानात गुंग व बेसावध असतो. अशा परिस्थितीत आपल्या मनात शंका निर्माण होईल की अशा प्रकारचा आत्मा फक्त मनुष्याचाच असतो का ? तर त्याअर्थाने पापबंध फक्त मनुष्यच करतात. इतर अप्रगत जीव, ज्यांना मन नाही, भाषाज्ञान नाही, झोप नाही, स्वप्न नाही असे निगोदी जीव पापबंध करतच नसावेत ! त्याचे समाधान असे आहे की - सर्व संसारी जीव हे षट्जीवनिकायांच्या (अर्थात् पृथ्वी, पाणी, अग्नी, वायु, वनस्पती व त्रसजीव) संपर्कातच असतात. एकटा जीव सर्वांपासून दूर, वेगळा राहूच शकत नाही. आहारासाठी एकमेकांवर अवलंबून असतात. कोणत्याही जीवाचे संसारात राहणे हेच अव्रताचे म्हणजे अप्रत्याख्यानाचे कारण आहे व तोच बंधाचा हेतू आहे. म्हणून कोणतीही जाणीव नसलेला निगोदी जीव असो किंवा पंचेंद्रिय संज्ञी (मनसहित) मनुष्य असो, सर्वांना पापबंध होतोच. अप्रत्याख्यानाने होणाऱ्या पापबंधापासून दूर राहण्याचा उपाय म्हणजे प्रत्याख्यान'. इतर योनींपेक्षा विचारशील मानवी योनीत प्रत्याख्यानाची सर्वाधिक शक्यता व क्षमताही आहे व म्हणूनच 'अठरा पापस्थानांपासून विरत राहण्याचा संकल्प' येथे सांगितला आहे.
प्रत्यक्ष आचरणात प्रत्याख्यानाचे पालन करण्यासाठी साधूंच्या दृष्टीने अत्यंत प्रभावी उपाय म्हणजे 'आत्मतुला' अर्थात् ‘आत्मौपम्यभाव' सांगितला आहे. आपल्या आत्म्यासमान दुसऱ्याचा आत्मा आहे, ही जाणीव ठेवून हिंसा, शासन, दंड, कष्ट, परिताप कोणासही करू नका, देऊ नका. म्हणून महाव्रत, समिति, गुप्ति इ.च्या रूपाने साधुधर्मात तसेच छोटे-मोठे नियम घेऊन, शपथ व शुभ संकल्पांच्या रूपाने गृहस्थधर्मात प्रत्याख्यानाशी जोडला आहे.
१८५