________________
पण प्रत्यक्ष जैन आचारात मात्र प्रत्याख्यान हे प्रायः आहाराशीच संबंधित
असे दिसून येते. परंतु आहार हे त्याचे फक्त आंशिक रूप आहे. पापस्थानाचे जे मूळ कषाय ते दूर करणे सर्वात महत्त्वाचे आहे. कारण चित्तात शिरलेले कषाय अथवा वैरभाव दीर्घकाळ व खोलवर राहतात. त्यांना सहजी दूर करता येत नाही. जसे ‘वाळा' नावाच्या गवताची सुगंधित मुळे एकमेकांत गुंतल्यामुळे, सहजासहजी पूर्ण उपटली जात नाहीत. उपटताना सूक्ष्म मूळ जरी राहिले तरी पुन्हा नवनिर्मिती होते. तसे कषाय असतात. निघून गेल्यावरही सूक्ष्मरूपाने जरी राहिले तरी निमित्त मिळताच वाढीस लागतात. म्हणून कषायांवर नियंत्रण ठेवता आलेच पाहिजे. आपल्या चित्तवृत्ती अशा पातळीवर असाव्यात की काही असो किंवा नसो, आपल्या आत्म्याचा आलेख हा एकसारखा दिसला पाहिजे. बाह्य वस्तूंची व्यवस्थापन पद्धती तर आपण शिकतच असतो पण भ. महावीरांनी अठरा पापस्थानांच्या त्यागाच्या रूपाने आंतरिक चित्तवृत्तींची व्यवस्थापन (management) पद्धती सांगितली आहे.
परिस्थिती, काळ, वेळ, संधी, दृष्टी इ. पाहून म्हणजेच पारिभाषिक भाषेत द्रव्य-क्षेत्र - काल- ल-भावानुसार कोणत्या वेळी कशाला महत्त्व द्यायचे, ते तुम्हीच ठरवा. 'हवा' हा जसा 'दुराग्रह' आहे तसा 'नको' हाही 'हठाग्रह'च आहे. नियमातले गुंतवलेपण व त्याने होणारे अनर्थही टाळू या. जीवन प्रसंगाप्रसंगाने साधेपणाने जगू या.
आजच्या व्यवहारात, त्या त्या अवस्थेत, त्या त्या भूमिकेत, अर्थात् मुलांविषयी असो, कुटुंबाविषयी असो, स्वतः विषयी असो अथवा धार्मिकतेविषयी असो, नेमके कुठे थांबले पाहिजे - याचे भान, याची जाणीव म्हणजे प्रत्याख्यान. जसा करियरचा उत्कर्षबिंदू असतो, तसा थांबण्याचाही उत्कर्षबिंदू असावा
९८६